काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर मंगळवारी जोरदार हल्ला चढविला. मोदी आणि बॅनर्जी यांच्यापासून लोकशाही आणि अनेकतत्त्ववादाला धोका आहे आणि पूर्वीच्या सरकारवर खापर फोडण्याची दोन्ही नेत्यांना सवयच आहे, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली आहे.

मोदी आणि ममता यांच्यातील लागेबांधे बंगालसाठी धोकादायक आहेत, या दोन्ही सत्ता लोकशाहीसाठी घातक आहेत, मोदी सरकारचा कारभार ज्या पद्धतीने सुरू आहे तो देशाच्या मूल्यांना धोकादायक आहे, धर्मनिरपेक्षवादाला आणि भारतीय संस्कृतीला धोका आहे, असे गांधी म्हणाल्या. एका निवडणूक जाहीर सभेत त्या बोलत होत्या.

ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस सरकारने देशातील जनतेला आशेचा खोटा किरण दाखविला. पाच वर्षांपूर्वी खोटी आश्वासने देऊन त्यांनी मते मागितली, आता जनतेला दहशत दाखवून मते मागत आहेत, मोदींनीही दोन वर्षांपूर्वी जनतेला स्वप्ने दाखविली, असेही त्या म्हणाल्या. मोदी आणि ममता यांना पूर्वीच्या सरकारवर खापर फोडण्याची सवयच आहे. गेल्या ६० वर्षांत काँग्रेसने काहीही केले नाही असे मोदी म्हणतात, मात्र गेल्या दोन वर्षांत सर्व काही झाले का, काँग्रेसने घटनात्मक संस्था निर्माण केल्या आणि लोकशाही रचना मजबूत केली आणि देशाला स्वयंपूर्ण बनविले,असेही गांधी म्हणाल्या.