गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार असून पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी गुजरातमध्ये प्रथमच जाहीर सभा घेतली आणि त्यामध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.

अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या सौराष्ट्र नर्मदा अवतरण जलसंपदा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे (सौनी) उद्घाटन मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी त्यांनी, प्रलोभने दाखवून निवडणुका जिंकता येणे शक्य आहे परंतु त्या पद्धतीने देशाचा कारभार करता येत नाही, असे सांगितले.

गुजरातमध्ये निवडणुका होणार असल्याची वेळ साधून मोदींचा दौरा असल्याची टीका काँग्रेसने केली त्याबाबत मोदी म्हणाले की, मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्यासमोर तुकडे फेकण्यावर आपल्या सरकारचा विश्वास नाही. या प्रकल्पासाठी आम्ही १५ वर्षे कठोर मेहनत केली आहे, असेही त्यांनी पाटीदार समाजाचे प्राबल्य असलेल्या सनोसारा गावातील सभेत सांगितले.

भाषणात मोदी यांनी जलसंवर्धनावर भर दिला. पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री झालो तेव्हा म्हटले होते की, शेतकऱ्यांनी वीजपुरवठय़ासाठी सरकारसमवेत लढण्यापेक्षा जलव्यवस्थापनावर भर द्यावा. मात्र आपले म्हणणे पटवून देण्यास दोन-तीन वर्षे लागली, असे ते म्हणाले. मात्र आता शेतकऱ्यांना आपले म्हणणे पटले असून ते जलसंवर्धन करीत आहेत.