जेव्हा भारत आणि चीन दोन देश भेटतात, त्यावेळी जगाचे लक्ष त्यांच्याकडे असते, असे सांगत चीनचे अध्यक्ष झी जिनपिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीवेळी या दोन्ही देशांचे जागतिक स्तरावरील महत्त्व स्पष्ट केले. ब्रिक्स देशांच्या परिषदेसाठी जिनपिंग आणि मोदी सध्या ब्राझीलमध्ये आहेत. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांवर सोमवारी चर्चा केली. ४० मिनिटांसाठी ही बैठक नियोजित असताना वास्तविक दोन्ही नेत्यांमध्ये एक तास २० मिनिटे चर्चा झाली.
यावेळी जिनपिंग यांनी मोदी यांना एशिया अॅंड पॅसिफिक शिखर परिषदेसाठी निमंत्रित केले. दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. भारत आणि चीनमधील सीमा प्रश्नावर शांततामय मार्गाने तोडगा काढण्याचेही बैठकीमध्ये निश्चित करण्यात आले.
दोन्ही नेते ब्रिक्स परिषदेसाठी साधारणपणे एकाच वेळेस ब्राझीलमध्ये आले. त्यानंतर सोमवारी लगेचच मोदी आणि जिनपिंग यांच्यामध्ये चर्चा झाली. मोदी यांचे गुजरातमधील सरकार आणि त्यांच्या विकास साधण्याचा दृष्टिकोन याचा जिनपिंग यांनी बैठकीमध्ये थेटपणे संदर्भही दिला.