अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील आगामी भेटीत द्विपक्षीय हितसंबंधांबरोबरच सामरिक संबंधांना चालना देण्यावर भर असेल, अशी माहिती व्हाइट हाऊसमधील प्रतिनिधींनी दिली. आर्थिक संबंध वृद्धिंगत करणे, संरक्षण क्षेत्रातील सहकार्याची व्याप्ती वाढविणे अशा मुद्दय़ांवर या भेटीत भर दिला जाईल, असे व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.
येत्या वर्षअखेर अमेरिका आणि नाटो सैन्य अफगाणिस्तानातून माघार घेत आहे. सीरिया आणि इराकमध्ये रण पेटले आहे. या दोन्ही ठिकाणी भारत आणि अमेरिका संयुक्तपणे काम करू शकतात. अशाच मुद्दय़ांवर द्विपक्षीय नेत्यांच्या बैठकीत भर देण्यात येईल, असे ओबामा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले. ओबामा आणि मोदी यांच्यातील पहिली औपचारिक चर्चा भारतीय वेळेनुसार मंगळवारी होणार आहे. तत्पूर्वी मोदी यांच्यासाठी ओबामा यांनी विशेष भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. व्हाइट हाऊसमधील ‘ब्ल्यू रूम’मध्ये हा शाही खाना आयोजित करण्यात आला आहे. या वेळी अध्यक्ष ओबामा यांच्याबरोबरच उपाध्यक्ष जो बिदेन, परराष्ट्रमंत्री जॉन केरी आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुसान राइस आदी मंडळीही उपस्थित राहणार आहेत. तर मोदींसह परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोव्हाल आणि भारताचे अमेरिकेतील राजदूत एस. जयशंकर आदी मंडळी या भोजनास हजर राहणार आहेत. भारतीय पंतप्रधानांच्या नवरात्रीच्या उपासांमुळे विशेष शाकाहारी भोजन ठेवण्यात येणार असल्याचे संकेत व्हाइट हाऊसमधून देण्यात आले आहेत.
मोदी यांची ट्विप्पणी
‘मॅडिसन स्क्वेअर’मधील भारतीय-अमेरिकी नागरिकांचा प्रतिसाद सद्गदित करणारा होता. येथील भारतीय जनतेशी संवाद साधण्याची मला मिळालेली संधी अनमोल होती. आपले कष्ट, कृतिप्रवणता आणि उच्च मूल्ये यामुळे या समुदायाने समाजात मानाचे स्थान पटकावले आहे. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. मी तुमचा कृतज्ञ आहे.