देशभरात गाजलेले ललित मोदी प्रकरण, व्यापम गैरव्यवहार आदींमुळे मंगळवारपासून सुरू होणारे संसदेचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता असून, या पाश्र्वभूमीवर सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच राष्ट्रीय लोकशाही आघाडी बैठक बोलावली आहे. विरोधकांच्या वादळाला तोंड देण्याची तयारी मोदींनी सुरू केली असून, व्यूहरचना करण्यासाठी सहयोगी पक्षांची मदत घेण्याचे ठरविले आहे. सरकार स्थापनेनंतर पहिल्यांदाच अशा प्रकारची बैठक होत आहे.
पावसाळी अधिवेशनात ललित मोदी प्रकरण तसेच व्यापम गैरव्यवहारावरून सरकारला लक्ष्य करण्याचा निर्धार प्रमुख विरोधी पक्ष कॉंग्रेस तसेच डाव्या पक्षांनी केला आहे. यामुळे या अधिवेशनात जोरदार ‘मुकाबला’ होईल, असे पंतप्रधान मोदीच शुक्रवारी म्हणाले होते. त्यामुळे सरकारची कसोटी लागणार आहे. विरोधकांचा सामना करण्यासाठी एकत्रित व्यूहरचना आखण्यासाठी मोदींनी सोमवारी रालोआची बैठक बोलावली आहे. शिवसेना या रालोआतील प्रमुख पक्षाने यापूर्वीच अशा बैठकीची मागणी केली होती. मोदींच्या या निर्णयाबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आनंद व्यक्त केला आहे.
ललित मोदी आणि व्यापम गैरव्यवहार संसदेत जोरदार मांडण्याचा निर्धार कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी यापूर्वीच केला आहे. या वादग्रस्त मुद्दय़ांबाबत मोदींनी मौन बाळगल्याबाबतही विरोधकांनी लक्ष्य केले आहे. त्याचबरोबर आयपीएलचे प्रमुख ललित मोदी यांच्याशी घनिष्ठ संबंध असून, त्यांना मदत केल्या प्रकरणात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्याची मागणी कॉंग्रेसने केली आहे.
पंतप्रधान या मंत्र्यांना पाठीशी घालत असल्याचाही आरोप केला जात आहे. त्याचबरोबर व्यापम प्रकरणात केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान यांच्याही राजीनाम्याची मागणी होत आहे. शिवाय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी, छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमण सिंह आणि महाराष्ट्रातील मंत्री पंकजा मुंडे यांनाही कॉंग्रेसने लक्ष्य केले आहे.

संसद अधिवेशन मंगळवारपासून सुरू होत आहे. त्याचे कामकाज शांततेत पार पडावे यासाठी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन आणि संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनीही सोमवारी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे.