भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या बदनामी मोहिमेमागे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा हात असल्याचा थेट आरोप करून संघाचे माजी अखिल भारतीय बौद्धिक विभागप्रमुख मा. गो. वैद्य यांनी गडकरींच्या गोटातून पहिली तोफ डागली. भाजपने मात्र लगेचच या वादापासून अंग झटकले असून, वैद्य यांचे हे वैयक्तिक मत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. गडकरी यांनीही या वादात अर्थ नसल्याचे स्पष्ट करताना भाजपच्या नेत्यांमध्ये एकजूट असल्याची ग्वाही दिली आहे.
मा. गो. वैद्य यांनी रविवारी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलेल्या लेखात म्हटले आहे की, गडकरीविरोधातील मोहिमेची पाळेमुळे गुजरातमध्ये रुजलेली आहेत. राम जेठमलानी यांनी गडकरींच्या राजीनाम्याची मागणी करणे आणि त्याच वेळी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आग्रह होणे, यातून मोदी गटाने गडकरींना लक्ष्य केल्याचे स्पष्ट आहे.
लालकृष्ण अडवाणी आणि नितीन गडकरी यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी हेच प्रबळ दावेदार उरले आहेत. त्यांचे समर्थक मोर्चेबांधणीला लागले असून प्रत्यक्षात नरेंद्र मोदींनी मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले आहे, अशा शब्दांत वैद्य यांनी मोदींना लक्ष्य बनविले आहे.
राम जेठमलानींचे वक्तव्य संशयाची सुई गुजरातच्या दिशेने वळविणारे आहे, असे सांगतानाच या मुद्दय़ावरील संपूर्ण मतप्रदर्शन आपले वैयक्तिक मत असून, त्यावर आपण ठाम आहोत, असेही वैद्य यांनी स्पष्ट केले आहे. जेठमलानी यांनी गडकरींविरोधात बंड केल्याबद्दल वैद्य यांनी त्यांच्यावर जबरदस्त टीकास्त्र सोडले असून पक्षाध्यक्षांविरुद्ध जाहीर मतप्रदर्शन करणे योग्य नाही, अशा कानपिचक्या दिल्या आहेत. गडकरींचा राजीनामाच हवा आहे तर पक्षाच्या व्यासपीठाचा वापर जेठमलानींना करता आला असता, असेही वैद्य यांनी म्हटले आहे. जेठमलानी यांचे पुत्र महेश जेठमलानी यांनी गडकरींवर टीका करीत नुकताच पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा राजीनामा दिला.