लडाख भागात चुमार आणि डेमचोक येथे चीनकडून झालेल्या घुसखोरीच्या पाश्र्वभूमीवर ‘उभय देशांनी आपले सामरिक संबंध अधिक व्यापक करावयास हवेत’ अशी अपेक्षा चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेत भारत-चीन संबंधांना प्राप्त होणारे नवे आयाम आशिया खंडातील सर्वच राष्ट्रांच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे मत जिनपिंग यांनी नोंदवले. त्यांच्या सादेला प्रतिसाद देतानाच भारतीय पंतप्रधानांनीही लडाख भागात चीनने केलेल्या घुसखोरीचा मुद्दा उपस्थित करीत ‘कळीच्या मुद्दय़ास’ हात घातला. तसेच शांततेसाठी सीमांचा सन्मान राखला जायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्ष क्षी आणि पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत उभय राष्ट्रांमध्ये १२ सहकार्य करार करण्यात आले. व्यापारवृद्धी, सांस्कृतिक, माहिती-प्रसारण विषयक, पर्यटन, रेल्वे, अवकाश संशोधन अशा विविध क्षेत्रांमध्ये हे सहकार्य करार करण्यात आले.
चीनी कम
चीनच्या कुरापतींमध्ये वाढ
बुधवारी साबरमती नदीकाठी येत आपल्या भारतदौऱ्याची सुरुवात करणाऱ्या जिनपिंग यांचे दुसऱ्या दिवशी राजकीय शिष्टाचाराप्रमाणे राष्ट्रपती भवनात स्वागत करण्यात आले. या भव्य स्वागतानंतर हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात चर्चेला सुरुवात झाली. या वेळी दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री उपस्थित होते. उभय देशांमधील संबंध सुदृढ व्हावेत, परस्परांना पूरक ठरावेत या हेतूंनी ही भेट होत असल्याचे चिनी अध्यक्षांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी १२ द्विपक्षीय करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. भारताशी असलेली व्यापारी तूट भरून काढण्यासाठी येत्या पाच वर्षांत चीन २० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. पंतप्रधान आणि चिनी अध्यक्ष यांच्यात सीमा प्रश्नापासून ते ‘पेपर व्हिसा’च्या मुद्दय़ापर्यंत विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
भारत आणि चीन यांच्यात १२ करार
*भारत आणि चीन या दोन्ही देशांमधील आर्थिक आणि व्यापारी संबंधांना बळकटी देणे हे या करारांचे मुख्य उद्दिष्ट आहे. येत्या पाच वर्षांत व्यापारतोल साधण्यासाठी आणि व्यापारी तूट भरून काढण्यासाठी चीनतर्फे भारतात २० अब्ज डॉलरची गुंतवणूक केली जाणार आहे.
*कैलास मानसरोवराच्या यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना सध्या सुरू असलेल्या उत्तराखंडमधील लिपूलेख या खिंडीबरोबरच सिक्कीममधील नथु ला या खिंडीचा मार्ग वापरण्यास मुभा देण्याचा करार उभयदेशांमध्ये करण्यात आला. सुषमा स्वराज आणि वँग यी या दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
*भारतातील रेल्वेमार्गाचे जाळे अधिक सक्षम करण्यासाठी दोन करार करण्यात आले. यामध्ये रेल्वेच्या गतीत वाढ, हाय-स्पीड रेल्वेच्या व्यावहारिकतेबाबत अभ्यास आणि रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास आदींचा समावेश आहे. रेल्वे मंत्रालय आणि चीनचे राष्ट्रीय रेल्वे प्रशासन या कराराच्या अंमलबजावणीसाठी कृती योजना तयार करतील.
*माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि चीनचे प्रसारमाध्यम, प्रकाशन, नभोवाणी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी प्रशासन यांच्यातही एक करार झाला. दोन्ही देशांमधील निर्मात्यांना सर्जनशील, कलात्मक, तंत्रविषयक, वित्तीय आणि विपणन या सर्वच आघाडय़ांवर सहकार्य करण्याची मुक्तता या करारान्वये देण्यात आली.
*सीमावर्ती भागात सीमांच्या उल्लंघनाद्वारे घडणाऱ्या गुन्ह्य़ांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीमाशुल्क प्रशासनांमध्ये करार करण्यात आला. दोन्ही देशांच्या सीमाशुल्क विभागांमधील सहकार्याद्वारे व्यापारास चालना देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
*अवकाश संशोधनाच्या क्षेत्रातही सहकार्य करण्याचा करार करण्यात आला. ज्याद्वारे अवकाश क्षेत्रात शांततामय मार्गानी संशोधन, वैज्ञानिक प्रयोगशीलतेस चालना आणि उपग्रह विज्ञानातील सहकार्य यावर भर देण्यात आला.
*संग्रहालये, पुरातत्त्व विभाग यांच्यासह प्रमुख सांस्कृतिक संस्थांमध्ये सहकार्य, पारंपरिक औषधे आणि औषधांचे मापदंड ठरविणे याबाबत उभयपक्षी माहितीची देवाणघेवाण, मुंबई आणि शांघाय या दोन शहरांना भगिनी शहरांचा दर्जा  देणे अशा करारांनाही या वेळी द्विपक्षीय मान्यता मिळाली.
सीमा प्रश्न उपस्थित केला..
चीनकडून वारंवार होणाऱ्या सीमेच्या उल्लंघनाबाबात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता प्रकट केली. दोन्ही देशांमध्ये शांतता आणि सौहार्दता वाढीस लागायला हवी असेल तर सीमांचा रास्त सन्मान राखला जायलाच हवा, असे मोदी यांनी जिनपिंग यांना सांगितले. परस्परांवरील विश्वासासाठी सीमांचा आदर अनिवार्य आहे, यावर दोन्ही देशांचे एकमत झाले, अशी माहिती मोदी यांनी या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
काँग्रेसची टीका
भारतातील चुमार आणि डेमचोक या प्रांतांत चीन घुसखोरी करीत असताना त्या देशाच्या अध्यक्षांना पंतप्रधान मोदी ढोकळे खाऊ घालत आहेत, अशी खरमरीत टीका काँग्रेसने केली आहे. चिनी सैन्याच्या गोळीबारात आपले जवान जखमी होत असताना पंतप्रधानांकडून जिनपिंग यांना दिली जाणारी वागणूक हीच का ५६ इंची छाती, असा सवाल युवा काँग्रेसचे अध्यक्ष राजीव सातव यांनी केला आहे.
विद्यार्थ्यांमध्ये रमल्या ‘फर्स्ट लेडी’..
चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या पत्नी आणि चीनच्या ‘फस्ट लेडी’ पेंग लियुआन यांनी येथे विद्यार्थ्यांशी मनसोक्त बातचीत केली. देशाच्या प्रगतीत आपलेही योगदान देता यावे यासाठी आपण सतत मेहेनत केली पाहिजे, असा सल्ला पेंग यांनी विद्यार्थ्यांना दिला. दक्षिण दिल्लीतील एका शाळेस ५१ वर्षीय पेंग यांनी भेट दिली. या भेटीत ४५ मिनिटे त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. वयाच्या पाचव्या वर्षांपासूनच मी सुलेखनकला शिकण्यास प्रारंभ केला, असे त्या म्हणाल्या. शालेय अभ्यासक्रमात योगविद्येचा समावेश असणे अभिनंदनीय असल्याचे मत त्यांनी नोंदवले. भारतीय महिला आकर्षक, मेहनती आणि कुटुंबास एकत्र राखणाऱ्या असतात, अशी प्रशस्ती पेंग यांनी भारतीय महिलांबाबत नोंदवली. या संवादादरम्यान चिनी लोकसंगीतातील काही गाणीही त्या विद्यार्थ्यांसह गुणगुणल्या.