जगभरात पसरलेल्या भारतीय लोकांनी भारताविषयी तयार केलेली उत्तम प्रतिमा अर्थात ‘ब्रॅण्ड इंडिया’चा उपयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबरअखेरीस न्यूयॉर्क येथे होणाऱ्या कार्यक्रमात करून घेतील, असे मत भाजपाचे खासदार राज्यवर्धन सिंग राठोड यांनी भारतीय-अमेरिकनांच्या बैठकीत बोलताना व्यक्त केले.
२८ सप्टेंबर रोजी न्यूयॉक येथील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण होणार असून या ऐतिहासिक भाषणात भारताबाबत जगभरात असलेल्या चांगल्या प्रतिमेचा अर्थात ‘ब्रॅण्ड इंडिया’चा लाभ उठविण्याविषयी ते प्रामुख्याने बोलतील असेही राठोड यांनी स्पष्ट केले.
भाजपाच्या परदेशी शाखेचे निमंत्रक विजय जॉली आणि राज्यवर्धन सिंग राठोड असे दोघेजण अमेरिकेतील दहा शहरांतील लोकांच्या भेटीगाठी घेण्यासाठी आले आहेत. भारतीय-अमेरिकन नागरिकांनी भारतीय लोकांच्या समूहातर्फे न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे होणाऱ्या नियोजित सभेत मोठय़ा प्रमाणावर सहभागी होऊन पाठिंबा द्यावा यासाठी राठोड आणि जॉली भारतीय-अमेरिकनांच्या भेटीगाठी घेत आहेत. आतापर्यंत जॉली यांनी लॉस एंजेलिस, डलस, ह्य़ूस्टन, अटलांटा, शिकागो, न्यूयॉर्क, नेवार्क, फिलाडेल्फिया आणि वॉशिंग्टन डीसी अशा दहा शहरांना भेटी दिल्या आहेत. त्याशिवाय जॉली व राठोड यांनी अनेक धोरणकर्ते, कायदेतज्ज्ञ तसेच काँग्रेसमन इड रॉईस आदींच्या भेटी घेतल्या आहेत.