बँकांनी गरिब आणि शेतकऱयांचे दु:ख जाणून कर्ज देताना कठोर भूमिका घेऊ नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरूवारी केले. देशातील शेतकऱयांच्या आत्महत्येच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन नरेंद्र मोदींनी हे आवाहन केले. भारतीय रिझर्व्ह बँकेला(आरबीआय) ८० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित आर्थिक समावेशन कार्यक्रमात मोदी बोलत होते. ते म्हणाले की, “देशातील बँकिंग क्षेत्राचा दिवसेंदिवस प्रसार व्हावा याचा विचार जर आपण करू शकतो मग, देशातील शेतकऱयांनी निधीच्या कमतरतेमुळे आत्महत्येचा मार्ग अवलंबण्याची गरज पडणार नाही यादृष्टीनेही आपण विचार करायला हवा.” तसेच देशातील गरिबांना मदत केल्याने बँका दिवाळखोरीला निघतील असे अजिबात वाटत नसल्याचेही ते पुढे म्हणाले. शेतकऱयांना भोगाव्या लागणाऱया यातनांची जाणीव बँकांना देखील हवी. बँकांनी गरिब आणि श्रीमंत असा भेदभाव न करता सर्वांना समान न्याय द्यायला हवा असे मोदी म्हणाले. सोबत रिझर्व्ह बँकेने वित्तीय समावेशाचा पुढील २० वर्षांचा आराखडा तयार करून देशातील चलनी नोटांसाठी स्वदेशी कागद आणि शाही वापरण्याचाही सल्ला यावेळी मोदींनी दिला.