पाकिस्तान दहशतवाद निर्यात करणारा देश असल्याची नरेंद्र मोदींनी केलेली टीका पाकिस्तानच्या जिव्हारी लागली आहे. नरेंद्र मोदींचे विधान हे विचारबद्ध पद्धतीने पाकिस्तानची प्रतिमा मलिन करण्याचा एक भाग आहे. त्यामुळे काश्मीर मुद्द्यावरुन जगाचे लक्ष विचलित करता येईल असा कांगावा पाकिस्तानने केला आहे.
नरेंद्र मोदींच्या विधानानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली. भारतीय नेतृत्व प्रक्षोभक विधान करतात आणि निराधार आरोप करुन पाकिस्तानची प्रतिमा मलिन करतात हे प्रकार दुर्दैवी आहे असे पाकिस्तानने म्हटले आहे. भारत काश्मीरमधील निर्दोष आणि स्वतःचे संरक्षण करण्यात अपयशी ठरलेल्या जनतेवर सुरक्षा यंत्रणांकडून होणा-या अत्याचारांवरुन लक्ष हटवण्यासाठी असे प्रयत्न करत आहे असे पाकिस्तानने म्हटले आहे.
गेल्या ७५ दिवसांमध्ये भारतीय सुरक्षा यंत्रणांनी काश्मीरमध्ये १०० हून अधिक लोकांना ठार मारले. तर शेकडो लोकांना अंधत्व आले असून हजारो नागरिक जखमी झाले.आंतरराष्ट्रीय स्तरावरही या प्रकरणाकडे मानवी हक्कांचे उल्लंघन म्हणूनच बघितले गेले असा दावा पाकिस्तानने केला आहे. संयुक्त राष्ट्र, इस्लामी देशांची सहकार्य संघटना आणि अन्य देशांनी या प्रकरणावर चिंता व्यक्त केल्याचे पाकने म्हटले आहे. भारतच पाकिस्तानमध्ये दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला आहे. दहशतवाद्यांनी कान उघडून नीट ऐकावे आणि मी पाकिस्तानी नेतृत्वालाही सांगू इच्छितो की आमच्या जवानांचे वीरमरण आम्ही विसरणार नाही. दहशतवाद पसरविण्याची पाकिस्तानची कृत्ये उघडी पाडून जागतिक पातळीवर मुत्सद्दीपणे पाकिस्तानची कोंडी करण्याची एकही संधी सोडणार नाही, असे मोदी म्हणाले होते. कोझीकोडमध्ये भाजपच्या कार्यक्रमात त्यांनी ही टीका केली होती. तर संयुक्त राष्ट्रातही भारताने पाकिस्तानची कोंडी करण्यास सुरुवात केल्याने पाकिस्तानच्या गोटात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे.