पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिका दौऱ्यासाठी आगमन झाले असून, त्यांनी भारतीय वंशाची अंतराळवीर कल्पना चावला हिच्या अर्लिग्टन येथील समाधिस्थळावर जाऊन श्रद्धांजली वाहिली. कल्पना चावला कोलंबिया अवकाशयानाच्या अपघातात मृत्युमुखी पडली होती.

मोदी यांचे अमेरिकेच्या दौऱ्यासाठी आगमन झाले असता त्यांनी कल्पना चावलाचे  पती व कुटुंबीयांशी संवाद साधला. तसेच भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स व तिचे वडील, तसेच नासाच्या काही अधिकाऱ्यांशीही त्यांनी चर्चा केली. अमेरिकेचे संरक्षणमंत्री अ‍ॅश्टन कार्टर, भारताचे राजदूत अरुण के. सिंग, अमेरिकेचे राजदूत रिचर्ड वर्मा, परराष्ट्र सचिव एस. जयशंकर, दक्षिण मध्य आशिया विभागाच्या सहायक मंत्री निशा देसाई बिस्वाल या वेळी उपस्थित होते. सुनीता विल्यम्स यांनी सांगितले, की पंतप्रधान मोदी यांनी माझी मैत्रीण व भारतीय वंशाची अंतराळवीर  कल्पना चावला हिच्या स्मृतिस्थळाला भेट दिली याबद्दल आम्ही आभारी आहोत. मोदी यांनी विल्यम्स हिच्या वडिलांशी गुजराथी भाषेतून संवाद साधताना त्यांना भारतभेटीचे निमंत्रण दिले. प्रकृतिस्वास्थ्य चांगले राहिले तर नक्कीच भारतात येईन, असे सुनीताच्या वडिलांनी मोदी यांना सांगितले. कल्पना चावला हिचे पती जीन पिअर हॅरिसन यांनी मोदी यांना पुस्तकांचा संच भेट दिला. ही पुस्तके कल्पना चावलावरील असून, त्यात हॅरिसन यांनी लिहिलेले कल्पनाचे चरित्रात्मक पुस्तकही आहे. हॅरिसन यांनी एक रंगीत जॅकेट परिधान केले होते त्याबाबत मोदी यांनी त्यांना विचारले असता ते जॅकेट गुजरातमधून मिळाल्याचे त्यांनी सांगितले. कल्पना चावला ही भारतीय वंशाची पहिली अवकाशयात्री होती व २००३ मध्ये कोलंबिया अवकाशयानाला झालेल्या अपघातात तिचा मृत्यू झाला होता. मोदी यांचे अमेरिकी काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात भाषण होणार आहे.