पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘जी-२०’ संघटनेच्या परिषदेसाठी चीनला जाण्यापूर्वी ३ सप्टेंबर रोजी एक दिवस व्हिएतनामला भेट देणार असून, त्यातून या प्रदेशातील भारताच्या हितसंबंधांबाबत चीनला इशारा देण्याचा प्रयत्न असल्याचे राजनैतिक वर्तुळात मानले जात आहे.

मोदींच्या दौऱ्यात भारताकडून व्हिएतनामला चार गस्ती नौका देण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा आहे. व्हिएतनामचे पंतप्रधान ऑक्टोबर २०१४ मध्ये भारतभेटीवर आले असता भारताकडून व्हिएतनामला १०० दशलक्ष डॉलरची मदत जाहीर करण्यात आली होती. त्याअंतर्गत या नौका दिल्या जाणार आहेत. याशिवाय उभय देशांत संरक्षणसामग्री पुरवठा, देखभाल-दुरुस्ती, सायबर सुरक्षा, संरक्षण दलांना प्रशिक्षण तसेच अन्य मदतीबाबत करार होण्याचीही शक्यता आहे. भारत व्हिएतनामच्या किनाऱ्याजवळील प्रदेशात खनिज तेल व नैसर्गिक वायू संशोधन करत आहे. त्या सहकार्यात विस्तार होणेही अपेक्षित आहे.

दक्षिण चीन समुद्रातील हक्कांच्या प्रश्नावरून व्हिएतनाम आणि चीन यांच्यात तणाव असल्याने भारत आणि व्हिएतनाम या दोन्ही देशांकडून द्विपक्षीय संबंधांना फारशी प्रसिद्धी दिली जात नाही. मात्र चीन भेटीच्या पूर्वसंध्येला व्हिएतनाम आणि शेजारील लाओस या देशांना भेट देऊन मोदी भारताचे या क्षेत्रातील हितसंबंध अधोरेखित करून चीनला छुपा इशाराच देत असल्याचे राजनैतिक वर्तुळात मानले जात आहे.