लोकसभा निवडणुकीत देशभरात आलेली मोदी लाट अद्याप कायम असल्याचे महाराष्ट्र व हरयाणा या दोन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी दाखवून दिले, असे ठोस प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केली होती. आजच्या निकालामुळे आम्ही काँग्रेसमुक्त भारताच्या दिशेने दोन पावले पुढे सरकलो आहोत, अशी प्रतिक्रिया अमित शहा यांनी दिली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसवर आगपाखड करणाऱ्या भाजपने सत्तास्थापनेसाठी बाहेरून पाठिंबा देण्याच्या राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. राज्यातील जनतेने भाजपला सत्तास्थापनेचा कौल दिल्याने भाजपच सत्ता स्थापणार, असे सांगून अमित शहा यांनी राष्ट्रवादीचा प्रस्ताव मान्य असल्याचे संकेत दिले. शिवसेनेने केवळ तीन जागांसाठी युती तोडल्याचा थेट आरोप करीत निकालानंतर कोण योग्य होते हे सिद्ध झाले आहे, असा टोला अमित शहा यांनी शिवसेनेला लगावला.पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, देशात मोदी लाट कायम आहे. महाराष्ट्रातून आघाडी सरकारला सत्तेतून घालवणे ही आमची प्राथमिकता होती. महाराष्ट्रात ११९ जागा लढवून आम्ही कधीही इतके मोठे यश मिळवू शकलो नव्हतो, परंतु युती तोडल्याने आम्ही ऐतिहासिक विजय मिळवला आहे. शिवसेना पक्ष तीन जागांवर अडून बसला होता, परंतु त्यांच्यासाठी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांचा बळी कसा देऊ, असा प्रतिप्रश्न अमित शहा यांनी केला.