अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा लाख रुपयांचा सूट घातला होता, असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी  यांनी केला. सिलमपूरसारख्या मुस्लीमबहुल मतदारसंघात पक्ष त्यांची पहिली जाहीर सभा गुरुवारी झाली. गेल्या विधानसभा निवडणुकीत अल्पसंख्याक मतांच्या भरवशावर कशाबशा आठ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने यंदाही अल्पसंख्याकबहुल मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. निर्धारित वेळेपेक्षा सुमारे अडीच तास उशिरा दाखल झालेल्या राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. हिंदू-मुस्लीम यांच्यात फूट पाडण्याचे भाजपचे षड्यंत्र असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. काळा पैसा मायदेशी आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करू, या मोदींच्या आश्वासनाची खिल्ली त्यांनी उडवली. राहुल यांनी आम आदमी पक्षाचाही समाचार घेतला. काँग्रेसला सत्तेत येण्यापासून रोखणे हाच आपचा एककलमी कार्यक्रम असल्याचा आरोप राहुल यांनी केला.