दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्हिडिओच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींवर आरोप केल्यानंतर गुरुवारी सोशल माध्यमातून केजरीवालांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत असल्याचे चित्र आहे. मात्र, दुसरीकडे केजरीवालांनी बुधवारी जारी केलेल्या व्हिडिओनंतर केजरीवालांना समर्थन देण्यासाठी ‘आप’चे कार्यकर्ते सोशल मिडियावर सक्रिय झाले आहेत. केजरीवालांच्या समर्थनार्थ #ModiJiArrestMeToo हा ट्रेंड सध्या ट्विटरवर पाहायला मिळत आहे. केजरीवाल यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी मोदीजी आम्हालाही अटक करा, अशी भूमिका घेत ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी केजरीवालांना पाठिंबा दर्शविला आहे. काही कार्यकर्त्यांनी केजरीवाल यांचा मफलर गुंडाळलेला स्केच फोटो शेअर करुन केजरीवालांना समर्थन दर्शविले आहे. केजरीवालांनी सोशल माध्यमात लोकप्रिय असणाऱ्या यूट्यूबवरुन १० मिनिटांचा एक व्हिडिओ शेअर केला होता. यूट्यूबवर प्रदर्शित केलेल्या व्हिडिओत मोदी आम आदमी पक्षाचा आवाज दाबत असल्याचा आरोप केजरीवालांनी केला. आम आदमी पक्षाच्या १० आमदारांना मोदी सरकारने अटक केल्याचा दाखला देताना, मोदी यांच्या सांगण्यावरुनच भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी सूत्रे चालविल्याचा आरोप केजरीवालांनी काल प्रदर्शित केलेल्या व्हिडीओमध्ये केला होता. मोदी रागाच्या भरात वेडीवाकडी कामे करत आहेत. त्यांच्या कामाची ही पद्धती त्यांच्यासह देशाला धोकादायक असल्याचे मत केजरीवालांनी म्हटले होते.