पंजाबमध्ये मुलीचा विनयभंग करून तिला धावत्या बसमधून फेकून दिल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद मंगळवारी लोकसभेत दिसले. लोकसभेतील पक्षाचे उपनेते अमररिंदर सिंग यांनी स्थगन प्रस्ताव देऊन पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर तातडीने चर्चा घेण्याची मागणी केली. पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीही कॉंग्रेसने केली.
पंजाबमधील मोगामध्ये एका मुलीचा विनयभंग करून तिला धावत्या बसमधून फेकून देण्यात आले होते. सोमवारी घडलेल्या या घटनेमध्ये संबंधित मुलीचा मृत्यू झाला. पंजाबजे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या खासगी बसमध्ये हा प्रकार घडल्यामुळे कॉंग्रेसने लोकसभेमध्ये त्यांना लक्ष्य केले. मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या बसमध्येच हा भीषण प्रकार घडल्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असल्याचे स्पष्ट होते आहे, असा आरोप अमरिंदर सिंग यांनी केला.
ते म्हणाले, राज्यातील कायदा व सुव्यवस्था संपूर्णपणे कोलमडली आहे. पंजाबमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे सातत्याने घडताहेत. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेमध्ये भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण आहे. या स्थितीत राज्यातील सत्ता सांभाळण्याचा शिरोमणी अकाली दल आणि भाजपला नैतिक अधिकार नाही. त्यामुळेच राज्यात लगेचच राष्ट्रपती राजवट लागू केली गेली पाहिजे.
विनयभंग करण्यात आलेल्या मुलीच्या मृतदेहावर तातडीने अंत्यसंस्कार करण्यात आल्यामुळेही अमरिंदर सिंग यांनी बादल सरकारवर टीका केली. त्यांनी बादल यांच्या सरकारच तुलना ब्रिटिश राजवटीशी केली.