सध्या पुराच्या विळख्यात सापडलेल्या गुजरातमध्ये एका नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अहमदाबादच्या गमडी गावालाही या पुराचा तडाखा बसला. यावेळी अनु कटारिया या महिलेने आपल्या २५ दिवसांच्या बाळाला पुराच्या पाण्यापासून वाचवण्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवले होते. पुराचे पाणी संपूर्ण गावातील अनेक घरांमध्ये शिरले होते. या ठिकाणी जवळपास ९ फुटांपर्यंत पाणी होते. त्यामुळे कटारिया कुटुंबियाने घराच्या दुसऱ्या मजल्यावर आसरा घेतला होता. मात्र, घरात शिरलेल्या पुराच्या पाण्याबरोबर कचरा आणि अनेक किटकही लोकांच्या घरात शिरले होते. त्यामुळे अनु कटारिया यांनी आपला मुलगा हितांशू याचे पुराचे दुषित पाणी आणि किटकांपासून रक्षण व्हावे, म्हणून त्याला प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवले होते. साधारण मध्यरात्रीपासून ते सकाळी ९ वाजेपर्यंत हितांशू प्लॅस्टिकच्या पिशवीतच होता. मात्र, त्यांची ही काळजी हितांशुच्या जिवावर बेतली. जवळपास आठ तास बाळाला पॉलिथीनच्या पिशवीत बंद ठेवल्यामुळे बाळाचा मृत्यू झाला.

याबाबत कुटुंबातील सदस्यांना काहीच माहिती नव्हते. मध्यरात्री घरामध्ये पाणी शिरण्यास सुरूवात झाली. पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास ९ फुटापर्यंत पाणी साचले होते. या पुरात आम्ही धान्य, वस्तू सगळंच गमावलं आहे. आमच्या बाळाला वाचवण्यासाठी कोणीतरी येईल या अपेक्षेत आम्ही होतो. मात्र, सकाळी ८- ९ वाजण्याच्या सुमारास बचाव पथक वाचवण्यासाठी आले असल्याचे अनू कटारियाने सांगितले. दरम्यान, या प्रकारानंतर पोलिसांनी अनु कटारिया यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच गुजरातमधील पूराची हवाई पाहणी केली होती. गुजरातमध्ये आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे अशात मुख्यमंत्री विजय रूपानी, इतर मंत्री आणि अधिकारी यांनी जनतेसाठी बचावकार्य कशाप्रकारे सुरू केलं याचाही आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला होता. राष्ट्रपतीपदाचा शपथविधी सोहळा झाल्यावर विजय रूपानी यांनी गुजरातच्या पूरस्थिती संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली होती ज्यानंतर लगेचच मोदींनी हवाई दौरा आणि पूरस्थितीची पाहाणी करण्याचं मान्य केलं होतं. पुरामध्ये ज्यांचा बळी गेला आहे त्यांच्या कुटुंबाला २ लाख रूपयांची मदत आणि जखमी झालेल्या ५० हजारांची मदत पंतप्रधान मदत योजनेतून देण्यात येतील असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. सौराष्ट्र आणि उत्तर गुजरातमध्ये पावसाने कहर माजवला आहे. त्यामुळे २५ हजार पेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे. तर १ हजार लोकांना पुरातून वाचवण्यात आलं आहे, ज्या १५ हजार लोकांच्या घरांमध्ये पाणी गेलं होतं अशाही सगळ्याच नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे. इतकंच नाही तर ज्या ठिकाणी पूर येऊ शकतो किंवा पावसाचा जोर वाढू शकतो अशी गावं रिकामी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. पुराच्या पाण्यामुळे मरणाऱ्यांची संख्या ७० वर पोहचली आहे.