येत्या ४८ तासांमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्यातर्फे देण्यात आली आहे. त्यानुसार आज किंवा उद्या मान्सून केरळात दाखल होईल. त्यामुळे तापमानवाढीने हैराण झालेल्या समस्त देशवासीयांचा जीव भांड्यात पडला आहे. मुंबईच्या आकाशातदेखील शनिवारी सकाळपासूनच मान्सूनपूर्वी पावसाची लक्षणे असलेल्या ढगांनी गर्दी केली आहे. केरळमध्ये मान्सूनने प्रवेश केल्यावर साधारण आठवडाभराने तो मुंबईत दाखल होतो. त्यामुळे पावसाच्या आगमनाच्या या वर्दीने मुंबईकर काहीसे सुखावले आहेत.  तीव्र उन्हाळ्यामुळे अंगाची लाहीलाही होत असतानाच मुंबईच्या अवकाशात शुक्रवारीदेखील काळ्या ढगांनी गर्दी केली होती. त्यामुळे किमान काहीवेळ तरी पावसाळी वातावरण तयार झाले. मात्र, हे वातावरण थोडाच वेळ टिकले होते. मात्र, हवामान खात्याच्या या वर्दीमुळे मुंबईकरांच्या आशा पुन्हा पालवल्या आहेत. 
तत्पूर्वी मान्सूनचे वारे ३० मेपर्यंत केरळमध्ये पोहोचण्याचा अंदाज भारतीय वेधशाळेने व्यक्त केला होता. अंदमानात २० मेऐवजी चार दिवस आधीच पोहोचलेले वारे काही काळासाठी थबकले होते.