भारतात यंदा सरासरीच्या आसपास पाऊस पडेल, असे भाकित भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आले. हवामान खात्याकडून मंगळवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती देण्यात आली.

यंदाच्या वर्षी नैऋत्य मान्सूनचे प्रमाण सरासरी असेल. तसेच मान्सूनचे प्रमाण देशाच्या सर्व भागांमध्ये चांगले असेल, अशी माहिती हवामान खात्याचे संचालक केजे रमेश यांनी दिली. हवामान खात्याच्या या अंदाजामुळे भारतातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील शेती, उद्योगधंदे आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्यादृष्टीने मान्सून हा खूप महत्त्वाचा घटक आहे.  भारतातील बहुतांश शेती मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून केरळमधून भारतात प्रवेश करतो. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात राजस्थानमधून मान्सून माघारी जातो. अल निनोचा इफेक्ट असला तरी त्याला नॉर्मलाईज करणारा आयओडी ( इंडियन ओशियन डायपोल) यावेळी कार्यरत असल्याने फार प्रभाव पडण्याची शक्यता नाही. मान्सूनच्या गेल्या ५० वर्षांतील आकडेवारी विचारात घेतल्यास यंदाचे पर्जन्यमान किमान ९६ टक्के ते कमाल १०४ टक्क्यांदरम्यान राहील, असे हवामान खात्याने सांगितले. गेल्यावर्षी हवामान खात्याने सरासरीच्या १०६ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र, त्यावेळी ९७ टक्केच पाऊस पडला होता. दरम्यान, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हवामान खात्याकडून पुन्हा एकदा मान्सूनबद्दलचे अंदाज जाहीर केले जातील.

भारतीय हवामान खाते यंदाच्या वर्षी चांगले पर्जन्यमान होणार, याविषयी सुरूवातीपासूनच आशावादी आहे. मात्र, जगभरातील हवामान खात्यांनी यंदा अल निनो परत येणार असा अंदाज वर्तवला आहे. ऑस्ट्रेलियातील हवामान खात्याने २८ फेब्रुवारी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार पॅसिफीक महासागरामध्ये अल निनोच्या निर्मितीसाठी कारणीभूत ठरणारी परिस्थिती दिसून आल्याचे म्हटले होते. प्रशांत महासागराचे तापमान वाढल्याने सामान्यपणे दक्षिण अमेरिकेकडून आशियाच्या दिशेने वाहणारे वारे मंदावतात. त्याचा भारतातील मोसमी पावसावर परिणाम होतो. अशा वेळी भारतीय उपखंडात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान आढळते. गेल्या १४० वर्षांत निम्म्याहून अधिक वेळा भारतातील प्रमुख दुष्काळांची वेळ अल निनोशी जुळून आली आहे. मात्र, भारतीय हवामान खात्याने या सर्व शक्यता फेटाळून लावल्या होत्या. यंदा भारतामध्ये मान्सूनला सुरूवातीच्या महिन्यांत अल-निनोचा फटका बसणार नाही. मान्सूनच्या चार महिन्यांच्या काळात शेवटच्या टप्प्यात अल-निनो सक्रिय होईल, असा विश्वास हवामान खात्याने व्यक्त केला होता.