दरवर्षीप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या भारतीयांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. येत्या २४ तासांत नैऋत्य मान्सून केरळात दाखल होणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. असे झाल्यास २ ते ३ जून रोजी मान्सून राज्यातही हजेरी लावण्याची शक्यता आहे. मान्सून सर्वात आधी अंदमानात दाखल होतो, त्यानंतर तो केरळमध्ये हजेरी लावतो.

यावेळी अंदमानात मान्सून एक दिवस आधीच दाखल झाला होता. त्यामुळे केरळ आणि राज्यातही तो वेळेत येईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. सध्या केरळमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी पूरक परिस्थिती निर्माण झाली असल्याचे २४ तासांत मान्सून केरळात दाखल होईल, असे हवामान खात्याने सांगितले आहे.

पुढील २४ तासांत दक्षिण अरबी समुद्र, मालदीव-लक्षद्विप बेटे, केरळ, तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालची खाडी अशा भागांमध्ये मान्सूनची वाटचाल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मान्सूनचे केरळमध्ये ३० मे रोजी आगमन होण्याची शक्यता ‘भारतीय हवामान विभागा’ने (आयएमडी) वर्तवली होती. हवामान खात्याचा हा अंदाज बरोबर ठरण्याची शक्यता आहे.

दरवर्षी सर्वसाधारणत: १ जून रोजी मान्सून केरळमध्ये येतो, परंतु गतवर्षी केरळमध्ये मान्सूनचे सात दिवस उशिरा आगमन झाले होते. यंदा मात्र मान्सूनच्या आगमनाची तारीख १ जूनच्याच आसपास असेल, असा अंदाज सुरुवातीला वर्तविण्यात आला होता. त्यानुसार २ ते ३ जून रोजी मान्सून हजेरी लावणार आहे. त्यामुळे पावसाची आतुरतेने वाट पहाणाऱ्या शेतकऱ्यांना आणि इतरही सर्वांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मान्सूनचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपलेले असताना मुंबईसह राज्यात सोमवारी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक गावांना पावसाचा फटकाही बसला. याशिवाय बिहारमध्ये झालेल्या मान्सूनपूर्व मुसळधार पावसाने २३ जणांचा मृत्यूही झाला.