मोबाईल फोन वापरकर्त्यांसाठी खूशखबर आहे. फोन कॉलचे दर लवकरच कमी होण्याची शक्यता आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) मोबाईल इंटरकनेक्शन वापर शुल्क (आययूसी) कमी केले आहे. ते १४ पैशांवरून सहा पैसे प्रतिमिनिट करण्यात आले आहे. मोबाईल कंपन्यांनी या कपातीचा लाभ ग्राहकांना दिल्यास कॉल दर कमी होतील. याचा सर्वाधिक लाभ पोस्टपेड ग्राहकांना होणार आहे.

मोबाईल ते मोबाईल टर्मिनेशन शुल्क प्रतिमिनिट १४ पैशांवरून ६ पैसे करण्यात आले आहे. १ ऑक्टोबर २०१७ पासून या निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी होईल. यासह इतर सर्व प्रकारच्या कॉलवरील (वायर-लाईन टू मोबाईल, वायर-लाईन टू वायर-लाईन) टर्मिनेशन शुल्क आकारणी १ जानेवारी २०२० पासून पूर्णपणे बंद करण्यात येईल, अशी माहिती ‘ट्राय’ने दिली आहे.

‘ट्राय’च्या या निर्णयाचा एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया सेल्युलर आदी कंपन्यांसाठी मोठा झटका मानला जातो. इंटरकनेक्ट वापर शुल्क दुप्पट म्हणजेच ३० पैसे प्रतिमिनिट करण्यात यावा, अशी त्यांची मागणी होती. तर या निर्णयाचा फायदा रिलायन्स जिओला अधिक होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. तर मोबाईल कंपन्यांची संघटना असलेल्या ‘सीओएआय’ने ‘ट्राय’चा हा निर्णय एकप्रकारे संकटच आहे, असे म्हटले आहे. या निर्णय़ाविरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचे संकेतही त्यांनी दिले.