मिशीगन विद्यापीठाच्या संशोधकांची निर्मिती रस्ते अपघातात अनेकवेळा डोक्याला इजा झाल्याने प्रवासी दगावतात. त्यावर उपाय म्हणून हेल्मेट वापरले जाते. पण साधी हेल्मेट वजनाने जास्त असतात त्यामुळे त्याचा मणक्यास त्रास होतो, परिणामी हेल्मेट हे संरक्षक पण कमी वजनाचे असले पाहिजे. वैज्ञानिकांनी आता फुटबॉलपटूंसाठी कमी वजनाचे पण इजा होण्यापासून जास्त चांगले संरक्षण करू करणारे हेल्मेट तयार केले आहे. यात आघातातून निर्माण झालेला धक्का किंवा शास्त्रीय भाषेत ऊर्जा पसरवली जाते, त्यामुळे मेंदुला इजा होण्यापासून जास्त संरक्षण होते. हेल्मेटच्या या रचनेस अडीच लाख डॉलर्सचा पुरस्कार मिळाला असून ते लष्करी जवानांसाठीही उपयुक्त आहे. आघाताची ऊर्जा पसरवली जाण्यासाठी यात हेल्मेटचा आकार आघातानंतर वेडावाकडा होतो. जसे, बाईकवर जर अपघात झाला व हेल्मेट घातलेले असेल तर आघाताचा पहिला धक्का हेल्मेटला बसतो व दुसरा धक्का डोक्याला बसतो. यात डोक्याला बसणारा धक्का कमी तीव्रतेचा असतो. कुठल्याही वस्तूचा आवेग हा गतिज ऊर्जा निर्माण करीत असतो. त्याचा विचार एक बल म्हणून करण्यापेक्षाही ते बल किती काळ कार्य करते हे लक्षात घेणे महत्त्वाचे असते. अमेरिकेतील मिशीगन विद्यापीठाच्या संशोधकांनी मिटिगॅटियम नावाचे हेल्मेटचे प्रारूप केले असून ते हलके, किमतीलाही कमी आहे. अमेरिकी फुटबॉलपटू ते वापरू शकतील, फुटबॉलमध्ये जखमी होण्याचे प्रमाण जास्त असल्याने हे हेल्मेट त्यासाठी जास्त मजबूत व हलके तयार केले आहे. डोक्याच्या संरक्षणासाठी हेल्मेट हे खेळाडूंचा वेग व वजन यांच्या मोजमापाशी निगडित आहे. त्याच्या वापराने धक्क्य़ाची तीव्रता नेहमीच्या हेल्मेटपेक्षा खूप कमी असते. सध्याची हेल्मेट फारसे संरक्षण करू शकत नाहीत व मेंदूची इजाही वाचवू शकत नाहीत. मिशीगन विद्यापीठाचे एलन अरूडा यांनी सांगितले की, आजची फुटबॉल हेल्मेट ही कवटी तुटू नये या उद्देशाने तयार केली जातात, पण ती आघाताची ऊर्जा पसरवू शकत नाहीत, त्यामुळे मेंदूवर आघात व्हायचा तो होतोच. डोक्याला बसलेला हादरा मेंदूला जखम कशी करतो याचे पूर्ण ज्ञान वैज्ञानिकांनाही अजून नाही, पण त्यांच्या मते आघाती बल हा महत्त्वाचा घटक त्यात आहे. आघात, स्फोट यांचा संशोधकांनी यांत्रिकीच्या अंगाने अभ्यास केला असता त्यांना काही गोष्टी निदर्शनास आल्या. त्यांनी काही पदार्थाचा वापर करून द्विमिती मेंदू व कवटी तयार केली, ते हेल्मेटमध्ये ठेवण्यात आले व नंतर टेबलटॉप आघात सादृश्यकाच्या मदतीने त्यावर प्रयोग केले गेले. किती ऊर्जा मेंदूच्या थरापर्यंत जाते व किती वेळा तो आघात पसरवला जाऊन त्या प्रारूपापर्यंत तो पोहोचत नाही यावर विचार करण्यात आला. गतिमान कॅमेऱ्याने मेंदूच्या प्रारूपाचा आघाताने आकार कसा बदलला याचे निरीक्षण करण्यात आले; यात नेहमीचे हेल्मेट हा आघात सहन क रत असले तरी ते मेंदूला इजा होण्यापासून संरक्षण देऊ शकत नाही हे सिद्ध झाले आहे. मिटिगॅटम या हेल्मेटने आघाताचा परिणाम २० टक्के कमी करण्यात आला व ते नेहमीच्या हेल्मेटपेक्षा जास्त उपयोगी असल्याचे सिद्ध झाले आहे. या हेल्मेटचे तीन थर आहेत, यात पहिला थर हा पॉलिकाबरेनेटचा असून दुसरा थर हा लवचिक प्लास्टिकचा आहे. या दोन थरांमुळे आघातानंतरच्या लहरी पसरवल्या जातात. त्यामुळे येणाऱ्या दाबाच्या लहरीची कंप्रता बदलली जाते, कारण हेल्मेटचा पुढचा थर कंप पावतो. तिसरा थर हा व्हिस्को इलॅस्टिकचा असून त्यात कोरडे डांबर भरलेले असते. ‘जर्नल ऑफ द मेकॅनिक्स अँड फिजिक्स ऑफ सॉलिड्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. हेल्मेटची रचना * पहिला थर- पॉलिकाबरेनेट ( हे नेहमीच्या हेल्मेटमध्येही असते) * दुसरा थर- लवचिक प्लास्टिक * तिसरा थर- कोरडे डांबर