स्विस बँकेत गुप्तपणे पैसा ठेवलेल्या ज्या खातेदारांची स्वित्झर्लण्डमध्ये चौकशी सुरू आहे, त्यांची नावे उघड करण्याचा निर्णय स्वित्झर्लण्ड सरकारने घेतला असून, त्या अंतर्गत आणखी तीन भारतीयांची नावे मंगळवारी उघड करण्यात आली. त्यामध्ये उद्योगपती यश बिर्ला, गुरजित सिंग कोचर आणि रितिका शर्मा यांचा समावेश आहे. यापूर्वी स्नेहलता साहनी व संगीता साहनी या दोन भारतीय महिलांची नावे उघड करण्यात आली आहेत. भारत सरकारने स्वित्झर्लण्ड सरकारकडे केलेल्या मागणीनुसार या सर्वांची नावे स्वित्झर्लण्ड सरकारच्या गॅझेटमध्ये प्रसिद्ध करण्यात आली. ‘स्विस फेडरल टॅक्स अॅडमिनिस्ट्रेशन’ने या खातेधारकांची काही माहिती या आधीच भारत सरकारकडे दिली आहे. भारतातील कर संकलन अधिकाऱयांकडून चौकशी करता यावी, यासाठी या खातेधारकांची नावे उघड करण्यात आली आहेत. दरम्यान, स्विस बॅंकेने नावे उघड केलेल्या खातेधारकांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.