पटेल समाजाकडून इतर मागासवर्गीय प्रवर्गात आरक्षण मिळावे यासाठी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर गुरुवारी गुजरातमधील वातावरण तणावपूर्ण शांततेचे होते. संवेदनशील भागांमध्ये अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले असून मृतांचा आकडा दहावर पोहोचला आहे.
आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी आंदोलकांचे २२ वर्षीय नेते हार्दिक पटेल यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. मात्र हार्दिक पटेल या आंदोलनातून माघार न घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे. पटेल समाजाला इतर मागास प्रवर्गात आरक्षण मिळावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी दूध, भाज्या या अत्यावश्यक सेवांचा पुरवठा बंद करावा, असे आवाहन हार्दिक पटेल यांनी केले आहे. या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ३५ लाख रुपयांची मदत त्वरित द्यावी, अशीही हार्दिक पटेल यांनी मागणी केली आहे. गुजरात विधानसभेत या प्रकरणामुळे विरोधकांनी गदारोळ घातला. बुधवारपासून लष्कराने अहमदाबादमध्ये ध्वजसंचलन करताना नागरिकांना शांततेचे आवाहन केले. अतिदक्षतेसाठी सूरत आणि मेहसाना येथेही लष्कराच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे. आंदोलकांमुळे रेल्वे सेवाही पूर्णपणे विस्कळीत झाली आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. जिल्हा आयुक्त राजकुमार बेनिवाल म्हणाले की, अहमदाबादमध्ये गुरुवारी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दैनंदिन व्यवहार सुरू आहेत.