भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी राम मंदिराचा मुद्दा लावून धरला आहे. ‘मशीद पाडली जाऊ शकते. मात्र मंदिर पाडले जाऊ शकत नाही. कारण तिथे देवाचे वास्तव्य असते,’ असे विधान स्वामी यांनी रविवारी बोलताना केले आहे. ‘मंदिर आणि मशीदांना सारखेच स्थान आहे, हा लोकांचा गैरसमज आहे. मशीद म्हणजे मुस्लिमांसाठी फक्त प्रार्थना करण्याचे एक सोयीस्कर ठिकाण आहे,’ असे स्वामी यांनी म्हटले.

‘मशीद हे मुस्लिमांसाठी फक्त प्रार्थना करण्याचे एक सोयीचे ठिकाण आहे. नमाझ मशिदीविना इतरत्र कुठेही अदा केला जाऊ शकतो. मात्र मंदिराचे तसे नाही. मंदिरात देव प्रवेश करतो आणु तेथील मूर्तीमध्ये त्याचे अस्तित्व असते, अशी आमची श्रद्धा आहे. देव मंदिराचा मालक असतो. अनेक लोक मशिदीवर त्यांचा हक्क असल्याचे सांगतात. मात्र मंदिरावर फक्त भगवान रामाची मालकी आहे. त्यामुळे मशीद हटवली जाऊ शकते. मात्र मंदिरात देवाचे अस्तित्व असल्याने त्या वास्तूला हातदेखील लावला जाऊ शकत नाही,’ असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले. सर्वोच्च न्यायालय राम मंदिराच्या बाजूने निर्णय देईल, असा विश्वास स्वामी यांनी व्यक्त केला. यासोबतच आपल्यासारखा तर्कसंगत मुद्दा अद्याप कोणीही मांडला नसल्याचा दावादेखील स्वामी यांनी केला.

‘आम्ही न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहात आहोत. आम्ही हा खटला जिंकू, असा विश्वास वाटतो. या खटल्यात माझ्यासारखे तर्कसंगत मुद्दे कोणीही उपस्थित केलेले नाहीत,’ असे स्वामी यांनी म्हटले. यावेळी स्वामी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अयोध्येला भेट देण्याच्या निर्णयाचेदेखील कौतुक केले. ‘मी योगी आदित्यनाथ यांच्या अयोध्या भेटीच्या निर्णयाचे स्वागत करतो. योगी आदित्यनाथ जे बोलतात तेच करतात आणि जे करतात तेच बोलतात. योगी आदित्यनाथ यांच्यासारखी प्रामाणिक व्यक्ती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी असणे, अतिशय चांगले आहे,’ असेही सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले.