भारतासह जगभरात फोफावलेल्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने इस्रायलच्या ‘मोसाद’ची मदत घेतली आहे. अत्यंत आक्रमक कार्यपद्धती, तंत्रशुद्ध प्रशिक्षण व आधुनिक साधने वापरणाऱ्या मोसादच्या चार सदस्यांचे पथक दिल्ली पोलिसांना प्रशिक्षण देण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहे. आज, सोमवारपासून सुरू झालेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात दिल्ली पोलिसांचे विशेष पथक (स्पेशल सेल), बॉम्ब निकामी करणारे पथक व फॉरेन्सिक विज्ञान प्रयोगशाळेतील सुमारे २५ वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. तब्बल बारा दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत अत्यंत गुप्तता पाळली जात आहे. हे प्रशिक्षण कुठे सुरू आहे, याचाही थांगपत्ता लागू दिलेला नाही. दिल्ली पोलिसांना विदेशी संस्थेकडून पहिल्यांदाच असे प्रशिक्षण दिले जात आहे.
एखाद्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाल्यास तेथील परिस्थितीचा अभ्यास कसा करावा, हल्ला कसा झाला असेल- याचे नाटय़मय रूपांतर करताना कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे, कोणाची साक्ष घ्यावी व प्रत्यक्ष तपास कसा करावा, या मुद्दय़ांवर प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षण कार्यक्रमास ‘पोस्ट लास्ट इन्व्हेस्टिगेशन अ‍ॅण्ड मॅनेजमेंट’ असे नाव देण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारतात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. संसद व मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षाव्यवस्थेचे धिंडवडे निघाले. या प्रकरणांचा तपास करताना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाची अनेकदा मदत घेतली गेली. विविध राज्यांना या पथकाने भेटी दिल्या होत्या. मात्र अनेकदा तंत्रज्ञान व प्रशिक्षणाच्या अभावामुळे या भेटी व्यर्थ ठरत. त्यामुळे मोसादची मदत घेण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात सुधारलेल्या परराष्ट्र संबंधांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानेच या प्रशिक्षणासाठी पुढाकार घेतला होता. दहशतवाद्यांचा नायनाट करण्यासाठी मोसादची थेट मदत घेतली जाण्याचीही शक्यता आहे.