अाईची आर्त हाक ऐकून कोमात असलेल्या चिमुकल्याने डोळे उघडून प्रतिसाद दिल्याचा चमत्कार राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात बानसूर गावात राहणाऱया कुटुंबासोबत घडला. गेल्या तीन आठवड्यांपासून कोमात असलेला आपला अडीच वर्षांचा चिमुकला डॉक्टरांच्या उपचाराला काहीच प्रतिसाद देत नसल्यामुळे कुटुंबियांची चिंता वाढत चालली होती. अनेक उपचाराअंती पदरी निराशा पडत असल्याने डॉक्टरांच्या आशाही मंदावत चालल्या होत्या. अखेरचा उपाय म्हणून निराश झालेल्या डॉक्टरांनी चिमुकल्याला त्याच्या आईच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलेले रेकॉर्डींग ऐकवण्यास सुरूवात केली. आणि दोनच दिवसांत कपिलने डोळे उघडले!
कपिलला दोन महिन्यांपूर्वी न्यूमोनिया झाला. वडील बलवीर यांनी कपिलला नजिकच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु, कपिलची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत असल्याचे पाहून डॉक्टरांनी त्याला जयपूर येथील रुग्णालयात हलविण्यास सांगितले. जयपूरच्या जे.के.लोन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी कपिल उच्च रक्तदाब, श्वसन समस्या आणि मेंदुतील रक्तस्त्राव या गंभीर व्याधींशी झुंझ देत होता. प्रयत्नांची शर्थ करूनही कोणत्याही उपचारांना कपिल प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी ‘म्युझिक थेरपी’ देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये कपिलच्या आईच्या आवाजा रेकॉर्ड करून  त्याला ऐकवण्यास सुरूवात करण्यात आली आणि पुढील दोनच दिवसांत कपिलने प्रतिसाद देण्यास सुरूवात केल्याचे त्याच्या कुटुंबियांनी डॉक्टरांच्या निदर्शनास आणून दिले. त्याच्या शरिराची हालचाल सुरू झाली. त्याने डोळे उघडले, हातपाय हलवले व रडायलाही लागला.
कपिलवर उपचार करणारे डॉक्टर गुप्ता म्हणाले की, कपिलवर डॉक्टरांकडून वैद्यकीय उपचार करुन झाले होते. तरीही यश मिळत नव्हते. अखेर वैद्यकीय उपचारासोबतच म्युझिक थेरपी देण्याचे ठरविले. म्युझिक शरिरातील ग्रंथींना प्रेरणा देण्याचे काम करते आणि संज्ञानात्मक कार्यपद्धतीत देखील सुधारणा होण्याची शक्यता असते. त्यामुळे पहिले चार दिवस कपिलला भक्तीगीतांचे रेकॉर्डींग ऐकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र कपिलचे वय लक्षात घेता डॉक्टरांनी भक्तीगीतांऐवजी त्याच्या आईचा आवाज रेकॉर्ड करून ऐकवण्यास सुरूवात केली आणि दोनच दिवसांत कपिलने प्रतिसाद देण्यास सुरूवात केली. मी याला चमत्कार म्हणणार नाही मात्र या उपचाराला कपिल प्रतिसाद देत असल्याचे पाहून आश्चर्य नक्कीच झाले आहे, असे डॉ.गुप्ता म्हणाले.