मध्यप्रदेशमधील भोपाळ येथील तुरुंगात सिमीच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात जीव गमावणा-या रमाशंकर यादव यांच्या मुलीला मध्यप्रदेश सरकारने लग्नाची अनोखी भेट दिली आहे. रमाशंकर यादव यांच्या मुलीचे शुक्रवारी लग्न झाले असून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी नववधूला लग्नमांडवातच सरकारी नोकरीचे पत्र भेट म्हणून दिले आहे.

२९ ऑक्टोंबरला रात्री भोपाळमधील तुरुंगातून सिमीच्या आठ दहशतवाद्यांनी पळ काढला होता. या दहशतवाद्यांनी पळ काढताना सुरक्षा रक्षक रमाशंकर यादव यांच्यावर चाकूने हल्ला केला होता. यामध्ये रमाशंकर यादव यांचा मृत्यू झाला. रमाशंकर यादव यांची छोटी मुलगी सोनियाचे ९ डिसेंबररोजी लग्न होणार होते. मुलीच्या लग्नासाठी त्यांनी तयारीही सुरु केली होती. पण आता रमाशंकर यांच्या अकाली निधनाने यादव कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला होता.

शुक्रवारी सोनियाचा विवाहसोहळा पार पडला असून या विवाहसोहळ्यात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान स्वतः उपस्थित होते. चौहान यांनी सोनियाला लग्नात भेट म्हणून नोकरीचे पत्रच दिले. सोनियाची क श्रेणीतील कर्मचारी म्हणून निवड झाली आहे. शिवराजसिंह चौहान यांनी सोनियाला दिलेल्या या अनोख्या ‘भेटवस्तू’चे लग्नमांडवात कौतुक होत होते.

रमाशंकर यांना दोन मुल आणि एक मुलगी आहे. ५७ वर्षीय यादव यांची काही वर्षांपूर्वी बायपास सर्जरी झाली होती. ते फेब्रुवारी २०१९ मध्ये निवृत्त होणार होते. यादव यांचा मोठा मुलगा प्रभूनाथ आणि छोटा मुलगा शंभूनाथ हे दोघेही सैन्यात आहेत. मुलीच्या लग्नात तिच्या वडीलांची अनुपस्थिती ही सर्वांच्याच मनाला चटका लावणारी होती.