अनेक वादग्रस्त मुद्दय़ांवर दोन महिने चर्चेचे गुऱ्हाळ यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी- भाजप सरकार येत्या रविवारी, १ मार्चला शपथ ग्रहण करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या समारंभाला प्रामुख्याने उपस्थित राहतील.
सईद यांच्या २५ सदस्यीय मंत्रिमंडळात भाजपचे उपमुख्यमंत्र्यासह १२ मंत्री राहणार आहेत.
सईद हे नऊ वर्षांच्या कालावधीतनंतर सत्तारूढ होत आहेत.  घटनेचे कलम ३७० आणि सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (एएफएसपीए) यांसारख्या वादाच्या मुद्दय़ांवर दोन्ही पक्षांमध्ये असलेले मतभेद गेले दोन महिने दीर्घ वाटाघाटींच्या माध्यमातून मिटवल्यानंतर पीडीपीचे प्रमुख मुफ्ती मोहम्मद सईद यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सुमारे दीड तास चर्चा केली.  पीडीपी व भाजपने निश्चित केलेला समान किमान कार्यक्रम (सीएमपी) रविवारी दुपारी ३ वाजता जाहीर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

ओमर यांचे टीकास्त्र
श्रीनगर : दिल्लीत एकीकडे पीडीपीचे प्रमुख मुफ्ती मोहम्मद सईद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेत असताना त्यावर नॅशनल कॉन्फरन्सने खोचक टिप्पणी केली आहे. पीडीपी-भाजपचे सरकार सत्तेवर येत असताना काश्मीरमध्ये जल्लोष कुठे आहे, असा सवाल माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केला आहे. नवी आघाडी पाहता आता राजधानी नागपूरकडे गेली, असा टोला त्यांनी लगावला. त्याचा संदर्भ नागपूरमधील संघाच्या मुख्यालयाकडे होता.

भाजपचा अभिवादन दिवस
पीडीपीसमवेत जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच सत्तेचा सोपान चढणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने येत्या १ मार्च रोजी ‘डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी अभिवादन दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. १ मार्च रोजी पीडीपी-भाजप सरकारचा शपथविधी होणार आहे. त्यानिमित्ताने देशभरात विविध ठिकाणी डॉ. मुखर्जी यांच्या प्रतिमेला मालार्पण तसेच फटाके फोडून, मिठाई वाटून हा ऐतिहासिक दिवस साजरा केला जाणार आहे.