२०१२ मधली वैयक्तिक संपत्ती २४.७ अब्ज डॉलर.. जगभरातील १०० अब्जाधीशांच्या यादीतील स्थान १८ वे.. गेल्याच्या गेल्या वर्षी म्हणजे २०११ मध्ये हे स्थान होते १९ वे.. रिलायन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे हे वर्णन आहे. विशेष म्हणजे सलग सहा वर्ष मुकेश अंबानी यांनी या यादीत स्थान पटकावले आहे.
ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्स यांनी केलेल्या जगभरातील १०० अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानींचे स्थान १८ व्या क्रमांकावर आहे. मेक्सिकोतील टेलिकॉम व्यवसायातील उद्योगसम्राट कालरेस स्लिम यांनी मात्र या यादीतील पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. त्यांची वैयक्तिक संपत्ती ७० अब्ज डॉलर एवढी आहे.
२०१२ मधील अब्जाधीशांच्या या यादीत बिल गेट्स, अमान्शिओ ओर्टेगा, वॉरन बफे यांचाही समावेश आहे. बफे यांनी गेल्या वर्षी प्रचंड मोठी रक्कम समाजकार्यासाठी खर्च करूनही त्यांची वैयक्तिक संपत्ती पाच अब्ज डॉलरने वाढली आहे. मात्र, यादीतील त्यांचा क्रमांक तिनावरून चौथ्या क्रमांकावर घटला आहे. आयकेईएचे संस्थापक अध्यक्ष इंग्वार काम्प्राड यांनी या यादीत पाचवा क्रमांक पटकावला आहे.