पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी त्यांच्या पहिल्यावहिल्या अमेरिका दौऱ्यासाठी रवाना झाले. पंतप्रधानांच्या या दौऱ्यात रिलायन्स उद्योगसमुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी त्यांच्याबरोबर असतील. नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी न्युयॉर्क येथे आयोजित करण्यात आलेल्या जेवणाच्या कार्यक्रमाला आणि वॉशिंग्टनमध्ये होत असलेल्या स्वागत सोहळ्याच्या कार्यक्रमात मुकेश अंबानी उपस्थित राहणार असल्याचे समजते. न्युयॉर्कमधील जेवणाच्या कार्यक्रमासाठी अमेरिकेतील प्रतिष्ठित भारतीय नागरिकही उपस्थित राहणार आहेत. तर, ३० सप्टेंबर रोजी वॉशिंग्टनमध्ये होत असलेल्या अमेरिकी-भारतीय व्यावसायिकांच्या परिषदेतही मुकेश अंबांनी उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी जपान दौऱ्यावर नरेंद्र मोदींबरोबर गेलेल्या उद्योगपतींच्या शिष्टमंडळात मुकेश अंबांनीचा समावेश असणे अपेक्षित होते. मात्र, काही कारणांमुळे मुकेश अंबानींना मोदींच्या बरोबरीने जपान दौऱ्यावर जाता आले नव्हते. अमेरिका आणि रिलायन्स उद्योगसमुहामध्ये यापूर्वीच्या काळात एकमेकांसोबत अनेक मोठ्या रक्कमेचे करार झालेले पहायला मिळाले होते. आगामी काळातही रिलायन्स उद्योगसमुह अमेरिकेत तेल आणि नैसर्गिक वायूच्या उत्खननासंदर्भात २०० कोटींचे व्यावसायिक करार होण्याची शक्यता आहे.