भारतातील अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांना वेतनवाढ मिळाली असून ती रिलायन्स इंडस्ट्रीजमधील मध्यम कामगाराच्या वेतनापेक्षा २५० पट अधिक म्हणजे १५ कोटी रूपये आहे. ही वेतनवाढ सात वर्षांसाठी आहे. आयटीसी लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष वाय.सी.देवेश्वर यांना कामगारांच्या तुलनेत ४३९ पट अधिक वेतनवाढ दिली असून त्यांचे वेतन १५ कोटी रूपये आहे.
माहिती तंत्रज्ञान उद्योगातील विप्रोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अझीम प्रेमजी यांचे वेतन मध्यम कर्मचाऱ्यांपेक्षा ८९ पट अधिक म्हणजे ४.७८ कोटी रूपये आहे. एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांचे वेतन २०१४-१५ या वर्षांत कर्मचाऱ्यांच्या १९ पट अधिक होते. याच बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य पुरी यांचे वेतन कर्मचाऱ्यांच्या ११७ पट अधिक आहे.
आयसीआयसीयच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांचे वेतन कर्मचाऱ्यांच्या ९७ पट अधिक आहे, तर अ‍ॅक्सिस बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिखा शर्मा यांचे वेतन मध्यम कर्मचाऱ्यांच्या ७४ पटींनी अधिक आहे. इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांचे वेतन कर्मचाऱ्यांपेक्षा ११६ पट, तर एचयुएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव मेहता यांचे वेतन कर्मचाऱ्यांपेक्षा ९३ पट अधिक आहे. वेदांता लिमिटेडचे अध्यक्ष नवीन अगरवाल यांचे वेतन २९३ पट अधिक आहे. नवीन कंपनी कायदा व सेबीच्या संहितेनुसार कर्मचारी व व्यवस्थापकीय अधिकारी यांच्या वेतनाची तुलना जाहीर करणे आवश्यक असते. अजून अनेक कंपन्यांनी अशी तुलना सादर केलेली नाही. अगदी मोजक्या कंपन्यात मध्यम कर्मचाऱ्यांच्या वेतनातील वाढ ही व्यवस्थापनातील बडय़ा अधिकाऱ्याइतकीच आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे वेतन आता पुढील सात वर्षे १५ कोटी राहणार आहे तर कर्मचाऱ्यांचे वेतन २०१४-१५ मध्ये ३.७१ टक्के वाढवल्याने ते ७.२९ लाख राहणार आहे. आयटीसीचे अध्यक्ष देवेश्वर यांचे वेतन २४ टक्के वाढले तर त्यांच्या कंपनीतील मध्यम कर्मचाऱ्यांचे वेतन १४ टक्के वाढले आहे. व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांची वेतनवाढ २० टक्के आहे. देवेश्वर यांचे वेतन २०१४-१५ मध्ये १५ कोटी होते पण निव्वळ वेतन ७.३ कोटी रूपये होते.
विप्रोचे अध्यक्ष प्रेमजी यांचे वेतन ५३ टक्के कमी म्हणजे ४.७८ कोटी झाले, तर कर्मचाऱ्यांचे वेतन ९.५ टक्के वाढले. विप्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी टी.के.कुरियन यांचे वेतन मात्र कर्मचाऱ्यांपेक्षा १७० पट अधिक आहे; त्यांना ३९ टक्के वाढ मिळाली होती. एचडीएफसीचे उपाध्यक्ष केकी मिस्त्री यांचे वेतन मध्यम कर्मचाऱ्यांच्या तुलनेत ८३ पट अधिक आहे, तर व्यवस्थापकीय संचालक रेणू सूद कार्नाड यांचे वेतन ७७ पट अधिक आहे. मिस्त्री व कार्नाड यांचे वेतन १५ टक्के वाढले आहे.