मोदी सरकार काळा पैसा परत आणण्यास अपयशी ठरले असून शंभर दिवसांत काळा पैसा भारतात आणण्याचे आश्वासन देणाऱयांनी केवळ जनतेच्या डोळ्यांत धुळ फेकण्याचा काम केले असल्याची टीका समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी केली आहे.  
सहा महिने होऊन गेले अजूनही काळा पैसा काही आला नाही. मोदी सरकार दिलेली आश्वासने पाळण्यात अपयशी ठरत आहे. त्यांना पुन्हा सहा महिने देऊयात पण त्याने पुढे काय होणार आहे? कुठे आहे काळा पैसा? मोदी सरकारने तो भारतात आणला का? अशा प्रश्नांची सरबत्तीच मुलायम यांनी सुरू करून मोदी सरकारवर काळा पैशाच्या मुद्द्यावरून निशाणा साधला. यूपीए सरकारने परदेशात असलेल्या बँकांकडील काळ्या पैशाची आकडेवारी तरी किमान दिली होती. परंतु, सध्याचे सरकार ते सुद्धा करत नाही. माझ्या मते काळा पैसा लोकांनी काढून घेतला आहे. बँकांमधील अनेक खाती रिकामीसुद्धा झाली असतील, असेही मुलायमसिंह यावेळी म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वसनांपैकी किमान एक आश्वासन देखील अजून मोदी सरकारने पूर्ण केले नसल्याचेही ते पुढे म्हणाले.