उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाच्या वतीने अखिलेश यादव हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील अशी घोषणा पक्षाचे सुप्रिमो मुलायमसिंह यादव यांनी केली आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरला नसल्याचे सांगत निवडून आलेले आमदारच आपला नेता ठरवतील असे ठासून सांगितले होते. उल्लेखनीय म्हणजे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री शिवपाल यादव यांनीही अखिलेश हेच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील असे म्हटले होते. गेल्या काही दिवसांपासून शिवपालसिंह यादव आणि अखिलेश यादव यांच्यात मतभेद सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी शिवपालसिंह यादव यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा देऊन दबाव निर्माण केला होता.
पक्ष आणि सामान्य लोकांमध्ये कोणताही संभ्रम नाही. माध्यमातच संभ्रम निर्माण झाला आहे. निवडणुकीत समाजवादी पक्षच विजयी होईल आणि अखिलेशच मुख्यमंत्री होतील असे पक्षाचे ज्येष्ठ नेते किरणमय नंदा यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. दोन दिवसांपूर्वी मुलायमसिंह यादव यांनी आपली भुमिका जाहीर केल्यानंतर त्यांचे छोटे बंधू आणि पक्षाचे महासचिव रामगोपाल यादव यांनी अखिलेश यांची बाजू घेत या निर्णयावर फेरविचार करण्याची मागणी केली होती.
अखिलेश यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर न करणे म्हणजे त्यांना कमजोर करण्यासारखे होईल आणि पक्षासाठी ते खूपच नुकसानकारक ठरेल. ४०३ सदस्य संख्या असलेल्या विधानसभेत जर पक्षाने १०० पेक्षा कमी जागा मिळवल्या तर त्यासाठी मुलायमसिंह स्वत: जबाबदार असतील असे रामगोपाल यांनी आपल्या पत्रात म्हटले होते.
याचदरम्यान शिवपाल यादव यांनी रविवारी आपली भुमिका जाहीर करताना पक्षाला जर यश मिळाले तर अखिलेश हेच मुख्यमंत्री बनतील असे म्हटले होते. शिवपाल यादव यांनी काही दिवसांपूर्वी कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीचा पक्ष कौमी एकता दलाचे समाजवादी पक्षात विलिनीकरण केले होते. परंतु त्यांचा हा निर्णय अखिलेश यादव यांना पसंत पडला नव्हता. त्यांनी याला विरोधही केला होता. त्यानंतर अखिलेश यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्यात आले व शिवपाल यादव यांच्याकडे हे पद देण्यात आले. त्यानंतर अखिलेश यांनी शिवपालसिंह यादव यांच्याकडील महत्वाची खाती काढली व त्यांचे निकटवर्तीय गायत्री प्रजापती यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला होता.
त्यानंतर यादव परिवारातील वाद चव्हाट्यावर आला होता. अखेर मुलायमसिंह यादव यांना पत्रकार परिषद घेऊन यादव कुटुंबीयांत कुठलाही वाद नसल्याचे जाहीर करावे लागले होते. शिवपालसिंह यादव यांनी त्यांची सर्व खाती परत देण्यात आली. तसेच गायत्री प्रजापती यांनाही मंत्रिमंडळात घेण्यात आले. यावरून मुलायमसिंह हे शिवपालसिंह यादव यांना महत्व देत असल्याचे दिसून आले होते.