मुंबईमध्ये २६/११ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानातील सात आरोपींविरुद्धच्या सुनावणीला बुधवारी पुन्हा एकदा सुरुवात झाली. लाहोरमधील दहशतवादविरोधी न्यायालयात नव्या न्यायाधीशांसमोर याप्रकरणी सुनावणी झाली. एकूण तीन साक्षीदारांची साक्ष यावेळी नोंदविण्यात आली.
मुंबईवरील हल्ल्याबद्दल भारतीय न्यायालयाने दोषी ठरविलेला अजमल कसाब याने दिलेल्या जबाबासंदर्भात त्याचबरोबर आणखी एक हल्लेखोर इम्रान बाबर हा पाकिस्तानी नागरिक असल्याप्रकरणी बुधवारी तीन साक्षीदारांनी त्यांची साक्ष नोंदविली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी पक्षाने मुल्तान जिल्ह्यातील निवडणूक अधिकारी, मुल्तानमधील सरकारी डॉक्टर आणि तेथील गृह विभागाचा एक अधिकारी यांची साक्ष न्यायालयापुढे नोंदविली. सरकारी डॉक्टरांनी इम्रान बाबर याचे वडील शहाबुद्दीन यांच्या डीएनए सॅम्पलचा अहवाल न्यायालयापुढे दिला. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱयांनी मुल्तामधील मतदारयादी न्यायालयापुढे सादर केली. यादीमध्ये शहाबुद्दीन आणि त्यांच्या कुटुंबीयांची नावे आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. साक्ष दिलेल्या सर्वांची बचाव पक्षाकडून उलटतपासणीही यावेळी घेण्यात आली.