मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ मध्ये अतिरेक्यांनी तीन दिवस काही ठिकाणांना वेढा घालून केलेला हल्ला म्हणजे उच्चतंत्राधारित  टेहळणी यंत्रणेच्या अपयशाचा परिणाम होता. त्यात तंत्रकौशल्यातील भारताच्या मर्यादा दिसून आल्या. गुप्तचर यंत्रणांचेही अपयश त्यात अधोरेखित झाले, असे फ्रंटलाईनचे पत्रकार सेबास्टियन रोटेला यांनी त्यांच्या हिडन इंटेलिजन्स ब्रेकडाऊन बिहाइंड द मुंबई अ‍ॅटॅक या अहवालात म्हटले आहे.
 या अहवालानुसार अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेचे माजी  कंत्राटदार एडवर्ड स्नोडेन यांनी काही वर्गीकृत कागदपत्रे फोडल्याने लष्कर ए तय्यबाचा अतिरेकी डेव्हिड हेडली याचा मुंबई हल्ल्यातील सहभाग उघड झाला व त्या हल्ल्याच्या घटनेमागची खरी बाब स्पष्ट झाली. मुंबईतील हल्ल्याचा जो केस स्टडी करण्यात आला त्यानुसार मुंबई हल्ल्यात टेहळणीच्या मर्यादा उघड झाल्या आहेत व दहशतवादविरोधी काम कसे करायला हवे याचा आढावाही त्यात घेण्यात आला आहे. प्रोपब्लिका   या शोधपत्रकारितेशी संबंधित संकेतस्थळाने हा केस स्टडी केला आहे. जर आधीच्या अपयशी हल्ल्यांचा अभ्यास व अधिक आक्रमक विश्लेषण केले असते व गुप्तचर माहितीची देवाणघेवाण झाली असती तर त्या माहितीचा मुंबई हल्ल्याला तोंड देताना उपयोग झाला असता. अहवालात सीआयएचे माजी दहशतवाद प्रमुख चार्लस फॅडिस यांचा हवाला देऊन म्हटले आहे की, दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी निव्वळ टेहळणीवर अवलंबून राहणे चुकीचे असते, गुप्तचरांच्या इशाऱ्यांचे महत्त्व कमी नसते पण त्याच्या जोडीला इतर बाबीही असाव्या लागतात. त्या नसतील तर पैसा व वेळ वाया जातो. अमेरिकन टेररिस्ट या हेडलीवरील वृत्तपटात दिलेल्या माहितीचा वापर फ्रंटलाईन व प्रोपब्लिका यांनी केला आहे. हेडलीला पकडल्यानंतर जी माहिती मिळाली होती त्यानुसार मुंबईत हल्ले करणाऱ्यांनी आधीच पाहणी केली होती असे दिसून येते. स्नोडेनने उघङ केलेल्या कागदपत्रांवरून असे स्पष्ट दिसते की, मुंबई हल्ल्याच्या खूप आधी ब्रिटिश गुप्तचरांनी  मुख्य अतिरेकी व तंत्रज्ञान प्रमुख झरार शहा याच्या ऑनलाईन संदेशांवर नजर ठेवली होती. ब्रिटनच्या जनरल कम्युनिकेशन्स हेडक्वार्टर्स या संस्थेची शाह याच्या वेब कारवायांवर लक्ष ठेवण्याची क्षमता होती. तो काय सर्च करतो, त्याने कुठली लक्ष्ये ठरवली आहेत, त्याच्याजवळ कुठले इंटरनेट फोन आहेत याची माहिती मिळवण्याची क्षमता ब्रिटिश संस्थेत होती, पण ब्रिटिश गुप्तचर संस्थेने शाह याच्यावर जी नजर ठेवली त्याबाबत मुंबईचा हल्ला होईपर्यंत माहितीचे विश्लेषण केले नव्हते. ब्रिटनची गुप्ततर संस्था जीसीएचक्यू व अमेरिकेची गुप्तचर संस्था एनएसए यांची दोस्ती असतानाही त्यांनी झरार शाहाच्या कारवाया अमेरिकेला कळवण्याची तसदी घेतली नाही.