आयपीएल गैरव्यवहाराप्रकरणी मुंबईतील न्यायालयाने ललित मोदी यांच्याविरुद्ध बुधवारी अजामीनपात्र वॉरंट जारी केले. आयपीएलमधील पैशांच्या गैरव्यवहाराची चौकशी सक्तवसुली संचालनालयाकडून सुरू आहे. त्यामध्ये सक्तवसुली संचालनालयाने ललित मोदी यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. या वॉरंटमुळे आता ललित मोदी यांच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीसही काढता येणे शक्य होणार आहे.
पैशांच्या गैरव्यवहाराविरोधीत कायद्यानुसार, सक्तवसुली संचालनालयाने ललित मोदी यांना नोटीस बजावली होती. मात्र, या नोटिसीला त्यांच्याकडून कोणतेच उत्तर न आल्याने सक्तवसुली संचालनालयाने २७ जुलै रोजी मुंबईतील न्यायालयात धाव घेऊन ललित मोदींविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची मागणी केली. त्यावर बुधवारी सुनावणी झाली. न्या. पी. आर. भावके यांनी सक्तवसुली संचालनालयाची बाजू ऐकून घेतल्यावर वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले. आतापर्यंत तीनवेळा सक्तवसुली संचालनालयाकडून ललित मोदी यांना नोटीस बजावली होती. मात्र, त्यापैकी एकाही नोटिसीला उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे अजामीनपात्र वॉरंट काढणे योग्य असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
अजामीनपात्र वॉरंटमुळे रेड कॉर्नर नोटिसही जारी करता येणार असल्यामुळे सध्या ब्रिटनमध्ये असलेल्या ललित मोदींपुढील अडचणी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.