मुंबई-दिल्ली ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेसमध्ये बुधवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी प्रवाशांच्या सामानावर मोठा डल्ला मारला होता. यावेळी चोरट्यांनी गाडीतील प्रवाशांकडील तब्बल दहा ते पंधरा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता. गेल्या काही वर्षांमध्ये देशातील कोणत्याही एक्स्प्रेस गाड्यांमध्ये इतकी मोठी चोरी झाली नव्हती. कालच्या घटनेत चोरट्यांनी तब्बल २० प्रवाशांकडील पैसे आणि मौल्यवान वस्तू मिळून लाखोंचा ऐवज लंपास केला होता. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासाला सुरूवात केली होती.

मात्र, पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनुसार ही चोरी बाहेरच्यांनी केली नसून यामध्ये ट्रेनमधीलच काही प्रवाशांचा सहभाग असल्याची शक्यता पुढे आली आहे. काल प्रवाशांकडून निझामुद्दीन रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिस दलाकडे तक्रार नोंदविण्यात आली होती. त्यानंतर लोहमार्ग पोलीस (जीआरपी) आणि रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) केलेल्या तपासादरम्यान काही निष्कर्ष समोर आले आहेत. ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेसने रात्री साडेदहाच्या सुमारास वडोदरा स्थानक सोडल्यानंतर चोरांनी गाडीतील लोक झोपल्याचा फायदा घेऊन आपल्या कामाला सुरूवात केली. वडोदरा स्थानकानंतर ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेस थेट मध्य प्रदेशातील रतलाम येथे थांबते. या सगळ्याचा विचार करता आणि प्रवाशांनी सांगितलेल्या माहितीवरून पहाटे २ ते ३ या काळात चोरट्यांनी आपली कामगिरी पार पाडली असावी. पोलिसांच्या माहितीनुसार यावेळी गाडीत सुरक्षेसाठी आरपीएफचे तीन कर्मचारी तैनात होते. मात्र, तरीही एसी-२ टायर आणि एसी-३ टायर अशा नऊ डब्यांमधील प्रवाशांकडील ऐवज चोरीला गेला.

हा सगळा प्रकार घडला तेव्हा चेन ओढून गाडी थांबवण्यात आली नव्हती. साधारणत: स्थानिक टोळ्यांनी चोरी केल्यास ते अशाप्रकारे गाडी थांबवून पसार होतात. याशिवाय, काही प्रवाशांची पाकीटं आणि पर्स एक्स्प्रेसमधील स्वच्छतागृहात सापडली होती. यावरून चोर हे नियोजनपूर्वक तिकीट काढून गाडीतूनच प्रवास करत होते, असा अंदाज आहे. त्यामुळे त्यांना चोरी करण्यासाठी पुरेसा अवधी मिळाला असावा, अशी माहिती आरपीएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

अशाप्रकारच्या घटनांमध्ये आम्ही लहानात लहान शक्यतेकडेही दुर्लक्ष करत नाही. यापूर्वी एक्स्प्रेस गाड्यांमधील चोरीच्या अनेक घटनांमध्ये कॅटरिंग कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळून आला होता. त्यामुळे आम्ही सध्या एक्स्प्रेसमधील सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी करत असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य सुरक्षा अधिकारी राजिंदर मलिक यांनी सांगितले. याशिवाय, तपास अधिकारी गेल्या दीड वर्षात या मार्गावर घडलेल्या गुन्ह्यांच्या पॅटर्नचाही अभ्यास करत आहेत.