शिमगा आणि गौरी-गणपती आदी सणांसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा जिव्हाळ्याचा विषय असलेला मुंबई-गोवा राष्ट्रीय  महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
वरील वस्तुस्थिती लक्षात घेऊन लवकरच या महामार्गाचे काँक्रीटच्या चार पदरी रस्त्यात रूपांतर केले जाणार असून त्यासाठी ४५०० ते ५००० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, असेही गडकरी यांनी सांगितले. लोकसभेत पुरवणी मागण्यांच्या उत्तरात गडकरी यांनी सदर माहिती दिली.
मुंबई-गोवा महामार्ग चार पदरी करण्यात भूसंपादन ही मोठी समस्या आहे. मात्र ती पुढील तीन महिन्यांत सोडविण्यात येईल. या मार्गावरील रस्त्यांचे रुंदीकरण झाल्यानंतर अपघातांचे प्रमाण कमी होईल, असेही गडकरी म्हणाले.
दरवर्षी रस्त्यावर पाच लाख अपघात होतात आणि त्यामध्ये जवळपास दीड लाख जण मृत्युमुखी पडतात, असेही गडकरी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.