मुंबई-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. प्रवाशांकडील दहा ते पंधरा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. राजस्थानमधील कोटा येथे काल मध्यरात्री ही घटना घडली. एक्स्प्रेसच्या एसी-२ टायर आणि एसी-३ टायर अशा नऊ डब्यांमधील प्रवाशांकडील ऐवज चोरीला गेला आहे. याआधीही धावत्या एक्स्प्रेसमध्ये चोरीच्या घटना घडल्याचं प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणी आतापर्यंत ११ प्रवाशांनी एफआयआर दाखल केला आहे. पदार्थांमधून गुंगीचे औषध दिल्यानंतर झोप लागली. संधी साधून चोरट्यांनी बॅगांमधील रोकड आणि दागिने चोरून पोबारा केल्याचं काही प्रवाशांनी तक्रारीत म्हटलं आहे. काही प्रवाशांची पाकीटं आणि पर्स एक्स्प्रेसमधील स्वच्छतागृहात सापडली, अशी माहितीही त्यांनी दिली. याआधीही अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी एक्स्प्रेसमधील डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामुळं घटनांचं प्रमाण कमी झालं आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिली.