जर्मनीमधील म्युनिक शहराच्या मध्यवर्ती मॉलमध्येअंधाधूद गोळीबार करणाऱ्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणाऱ्या १८ वर्षीय हल्लेखोराकडे दोन देशाचे नागरिकत्व होते. म्युनिकमध्ये राहणाऱ्या या तरुणाकडे इराणचे देखील नागरिकत्व असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शनिवारी रात्री  शॉपिंगमॉलमध्ये झालेल्या गोळीबारात ९ जणांचा मृत्यू झाला होता. गोळीबारानंतर संबंधित आरोपीने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. काही दिवसांपासुन युरोपमध्ये अशा घटना वारंवार होत असल्याचे दिसत आहे. युरोमधील नागरिकांवर करण्यात आलेला हा तिसरा हल्ला होता.  हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेत तीन हल्लेखोर सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला होता. मात्र, अंतिम तपासामध्ये एका व्यक्तिनेच हा हल्ला केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी हल्लेखोराला पकडण्यासाठी विशेष मोहिम राबवली होती.  संबंधीत हल्लेखोर आयसिस संघटनेचा प्रभावी असला तरी, त्याचा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध तपासात आढळलेला नाही. तसेच यापूर्वी कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे देखील पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, जर्मनीमधील भारतीय नागरिक सुरक्षित असल्याचे केंद्रीय परराष्टमंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले आहे.