* सुलोचना चव्हाण,अरुण काकडे यांनाही पुरस्कार
* विनायकराम व रतन थिय्याम यांना खास विद्यावृत्ती
ग्रॅमी पुरस्कार विजेते संगीतकार टी. एच. विनायकराम, ज्येष्ठ नाटककार रतन थिय्याम यांना संगीत नाटक अकादमीची विद्यावृत्ती जाहीर करण्यात आली असून, दक्षिण भारतीय संगीतकार इलयाराजा यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील हिंदूस्थानी शास्त्रीय गायक अजय पोहनकर, नाटय़ दिग्दर्शक वामन केंद्रे, लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण व निर्माते अरुण काकडे यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
संगीत अकादमी विद्यावृत्तीसाठी व्हायोलिनवादक एन. राजम, विनायकराम व थिय्याम या तिघांची निवड झाली आहे. अतिशय मर्यादित कलाकारांना ही विद्यावृत्ती दिली जाते. आतापर्यंत चाळीसजणांना ती मिळाली आहे.
संगीत नाटक अकादमी विद्यावृत्ती ही ३ लाख रुपयांची असते, तर अकादमी पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये, ताम्रपत्र व शाल असे असते. अकादमीच्या कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी झाली. त्यात संगीत, नृत्य, नाटक या क्षेत्रांतील एकूण ३६ कलाकारांची २०१२च्या अकादमी पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. राजशेखर मन्सूर व अजय पोहनकर (हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत), साबीर खान (तबला), बहाउद्दीन डागर (रुद्रवीणा), ओ. एस. त्यागराजन (कर्नाटक शास्त्रीय संगीत), म्हैसूर एम. नागराजा (व्हायोलिन), के. व्ही. प्रसाद (मृदुंग), इलयाराजा (सर्जनशील व प्रायोगिक संगीत), भाई बलबीरसिंग रागी (गुरबानी). नृत्यामध्ये प्रियदर्शनी गोविंद (भरतनाटय़म), विजय शंकर (कथक), वाझेगाडा विजयन (कथकली), वेदान्तम रामलिंग शास्त्री (कुचीपुडी), शर्मिला विश्वास (ओडिसी), जयनारायण सामल (छाऊ), पैनकुलम दामोदर चकयार (कुटियट्टम), ज्वाला प्रसाद (संगीत व नृत्य), अदिती मंगलदास (सर्जनशील व प्रायोगिक नृत्य) यांची निवड करण्यात आली आहे.
नाटय़क्षेत्रात आठजणांची संगीत नाटक अकादमी पुरस्कारासाठी निवड केली आहे. त्यात अर्जुनदेव शरण (नाटयलेखन), त्रिपुरारी शर्मा व वामन केंद्रे (दिग्दर्शन), परवेश सेठी, निर्मल ऋषी, परसाई कन्नप्पा संवादन (अभिनय), मुरारी रॉयचौधरी (नाटय़संगीत), गुलाम रसूल भगत (नाटय़परंपरा), लोककलांमध्ये गोरू चनबसप्पा (कर्नाटक), किनरम नाथ ओझा, सुखनानी ओजपली (आसाम), प्रेम सिंग देहाती (लोकनाटय़-हरयाणा), सुलोचना चव्हाण (लावणी- महाराष्ट्र), मथनूर शंकरन कुट्टी मरार (थयाम्बका- केरळ), गोविंद राम निर्मळकर (नाचा- छत्तीसगड) हीरासिंग
नेगी (मुखवटे निर्मिती-हिमाचल प्रदेश), प्रफुल्ला करमाकर (पारंपरीक बाहुल्यांचे खेळ- पश्चिम बंगाल) यांची निवड झाली आहे. नंदिनी रामाणी व अरुण काकडे
यांना र्सवकष कामगिरीसाठी अकादमी पुरस्कार जाहीर झाले आहेत.