मध्यप्रदेशातील खिरकीया या रेल्वेस्थानकावर बॅगेत गोमांस असल्याच्या संशयावरून गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांकडून एका मुस्लिम जोडप्याला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. मोहम्मद हुसेन आणि त्यांची पत्नी नसीमा हे दोघेजण हैदाराबाद येथील आपल्या नातेवाईकांकडून खुशीनागर एक्स्प्रेसने हरदा येथील आपल्या घरी परतत होते. त्यावेळी ही घटना घडली. माझ्या पत्नीने आमचे सामान तपासण्यास आक्षेप घेतला तेव्हा गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी तिला मारहाण केली. सहप्रवाशांनीही त्यांना विरोध केला. त्यातून वादावादी झाल्यानंतर या लोकांनी हुसेन व त्यांच्या पत्नीला सरळ मारहाण सुरू केली. हुसेन यांच्या म्हणण्यानुसार, या लोकांनी त्यांचे सामान गाडीच्या बाहेर फेकून दिले. त्यांच्या पत्नीला स्वच्छतागृहाच्या दिशेने खेचून नेण्याचाही प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी स्थानकावरील काही लोकांनी मदत केल्यामुळे ते या संकटातून वाचले.  आम्ही भारतात राहतो आणि आम्हाला चांगल्या आणि वाईट गोष्टींची जाण आहे, आम्ही फक्त बकऱ्याचे मटण खातो. गोरक्षा समितीच्या कार्यकत्यांनी जप्त केलेली ती बॅग आमची नव्हती, असे हुसेन यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना छाप्यादरम्यान सापडलेल्या बॅगमध्ये गोमांस असल्याचा दावा केला आहे. मात्र, प्रयोगशाळेत तपासणी करण्यापूर्वीच हे गोमांस नसल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गोरक्षा समितीच्या दोघाजणांना अटक केली आहे. याशिवाय, जोडप्याच्या नातेवाईकासह ट्रेनमधील नऊ प्रवाशांना अटक करून जामिनावर सोडून देण्यात आले. हा सगळा प्रकार घडला तेव्हा हुसेन यांनी खिरकीया स्थानकाजवळीm त्यांच्या नातेवाईकांना मदतीसाठी बोलावले. हे नातेवाईक काही स्थानिकांसह त्याठिकाणी आले. यावेळी हुसेन यांचे नातेवाईक आणि गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली.