ट्रम्प प्रशासन येताच आठ दिवसांतील घटना

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लिमांना प्रवेश बंदी करण्याचा आदेश जाहीर केल्यानंतर व्हाइट हाऊसमध्ये काम करणाऱ्या बुरखाधारी मुस्लीम महिलेने नोकरी सोडून दिली. नवीन प्रशासनात तिने केवळ आठ दिवस काम केले. रूमाना अहमद असे तिचे नाव असून ती २०११ पासून व्हाइट हाऊसमध्ये काम करीत होती व ती मूळ बांगलादेशी वंशाची आहे.

राष्ट्रीय सुरक्षा मंडळातही तिने काम केले आहे. देशासाठी जे चांगले आहे त्याला उत्तेजन देणे हे माझे कामच होते ते मी केले. व्हाइट हाऊसच्या वेस्ट विंगमध्ये मी एकटीच बुरखा घालत होते. ओबामा प्रशासनात मला सुरक्षित वाटत होते. असे तिने द अ‍ॅटलांटिकमधील लेखात म्हटले आहे.

अनेक अमेरिकी मुस्लिमांप्रमाणेच मीही ट्रम्प यांनी २०१६ मध्ये मुस्लिमांना लक्ष्य केले जात असतानाचा अनुभव घेतला पण ट्रम्प प्रशासनाच्या काळात मुस्लीम धर्माकडे चुकीच्या दृष्टिकोनातून पाहिले गेले व ट्रम्प यांनी मुस्लीम बंदीचा आदेश काढल्यानंतर आठच दिवसांत मी नोकरी सोडली. जर कुणी आम्हाला सहकारी नागरिक न समजता धोका समजत असतील तर त्यांच्यासमवेत राहणे अवघड होते. नोकरी सोडण्याच्या आधीच्या दिवशी मी राष्ट्रीय सुरक्षा मंडळ संपर्क सल्लागार मायकेल अँटन यांना निर्णयाची कल्पना केली. सुरुवातीला त्यांनी आश्चर्य व्यक्त केले पण नंतर शांत राहिले. मी का नोकरी सोडत आहे हे त्यांनी विचारले नाही मग मीच कारण सांगितले. पण त्यांनी नुसतेच ऐकले, माझ्याकडे पाहिले, काही बोलले नाहीत. रूमाना अहमद हिचे आईवडील बांगलादेशातून १९७८ मध्ये अमेरिकेत आले. तिने सांगितले की, ओबामा यांच्यामुळे प्रेरित होऊन २०११ मध्ये व्हाइट हाऊसमध्ये नोकरी सुरू केली त्याआधी जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातून पदवी घेतली.

भारतीय राजदूत सरना यांची ट्रम्प यांच्यासोबत भेट

भारताचे अमेरिकेतील राजदूत नवतेज सरना यांनी डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच त्यांची ओव्हल ऑफिस येथे भेट घेतली. ट्रम्प यांनी विशेष कार्यक्रमात सर्व नव्या राजदूतांची भेट घेऊन एकत्र छायाचित्र काढले. त्यात सरना हेदेखील उपस्थित होते. सरना हे भारतीय परराष्ट्र सेवेतील १९८०च्या तुकडीतील राजनैतिक अधिकारी असून अमेरिकेतील निवडणुकीच्या काही दिवस आधीच त्यांनी अमेरिकेतील पदभार स्वीकारला होता.

कॅन्सास आणि मिसुरीच्या गव्हर्नरांकडून निषेध

अमेरिकेत भारतीय अभियंत्याची हत्या झाल्याच्या घटनेचा तेथील कॅन्सास आणि मिसुरी या राज्यांच्या गव्हर्नरांनी निषेध केला असून या प्रकरणी जलदगतीने कायदेशीर कारवाई करण्याची हमी दिली आहे.

सीरियन छायालेखकास प्रवेश नाकारला

ऑस्कर पुरस्कारात नामांकन मिळालेले सीरियन छायालेखक खालीद खतीब यांना अमेरिकी स्थलांतर अधिकाऱ्यांनी देशात येण्यास परवानगी नाकारली आहे. द व्हाइट हेल्मेट्स या माहितीपटासाठी त्यांना नामांकन देण्यात आले होते. खतीब यांच्याबाबत वादग्रस्त माहिती समजल्यानंतर त्यांना प्रवेश नाकारण्यात आला.

‘भारतीय समुदायाने एक होण्याची गरज’

अमेरिकेत भारतीय अभियंत्याची नुकतीच झालेली हत्या ही दुर्दैवी घटना असून त्या पाश्र्वभूमीवर तेथील सर्व भारतीयांनी एक होण्याची गरज आहे, असे मत अमेरिकेतील शीख समुदायाच्या नेत्याने व्यक्त केले. गुरिंदरसिंग कालसा असे त्यांचे नाव असून ते इंडियन-बेस्ड सिख्स पॉलिटिकल अ‍ॅक्शन कमिटी या संघटनेचे अध्यक्ष आहेत.

टॉम पेरेझ डेमोकॅट्रिक पक्षाचे नवे अध्यक्ष

अमेरिकेतील डेमोकॅट्रिक पक्षाच्या अध्यक्षपदी टॉम पेरेझ यांची निवड झाली आहे. पेरेझ हे पूर्वाश्रमीचे लेबर सेक्रेटरी होते. डेमोकॅट्रिक पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अ‍ॅटलांटा येथे झालेल्या परिषदेत ही निवड करण्यात आली. निवडणुकीच्या काळात विस्कळीत जालेल्या पक्षाच्या पुनर्बाधणीचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.