पाकव्याप्त काश्मीरमध्ये असेंब्ली निवडणुकीत सत्ताधारी पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझ गटाने विजय मिळवला आहे. ४१ पैकी ३० जागा या गटाला मिळाल्या आहेत. त्यामुळे त्या पक्षाला दोन तृतीयांश बहुमत मिळाल्याचे स्पष्ट आहे.

पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझ गटाने काल झालेल्या निवडणुकीत बहुमत मिळवले असून २६ पक्षांचे ४२३ उमेदवार त्यात सहभागी होते. पाकिस्तान पीपल्स पार्टीला दोन जागा मिळाल्या आहेत. इमरान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक इन्साफ पक्षाला २ तर मुस्लीम कॉन्फरन्सला तीन जागा मिळाल्या. पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझ, पाकिस्तान पीपल्स पार्टी, पाकिस्तान तेहरिक इन्साफ यांच्यात चुरस होईल असा अंदाज होता, पण राजकीय पंडितांचे अंदाज चुकवून पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझ गटाने बाजी मारली आहे. एकूण २.६७४ दशलक्ष काश्मिरी लोकांनी यात मतदानाचा अधिकार बजावला. आझाद जम्मू व काश्मीर असेंब्लीचे सदस्य निवडण्यासाठी ही निवडणूक झाली असून १९७५ मध्ये तेथे संसदीय पद्धत सुरू करण्यात आली होती. पाकव्याप्त काश्मीर १४ हजार २४५ चौरस किलोमीटरचा असून आताच्या निवडणुकीत संपूर्ण पाकिस्तानचाही काही भाग समाविष्ट होता कारण ४१ पैकी १२ जागा थेट निवडल्या जातात. भारतीय काश्मीरमधून आलेल्या निर्वासितांसाठी या बारा जागा आहेत. निवडणुका शांतेतत पार पडल्या असून त्यात लष्कराची देखरेख होती. पाकिस्तान तेहरिक इन्साफ गटाच्या कार्यकर्त्यांनी दोन मतदान केंद्रांवर गोंधळ घातला असून त्यात पाचजण जखमी झाले. पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी काश्मिरी लोक व नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन केले आहे. या निकालामुळे भारतातील काश्मिरी लोकांच्या लढय़ास पाठबळ मिळेल, काश्मिरी बंधूंना मदत करण्यास आम्ही तयार आहोत असे मत शरीफ यांनी व्यक्त केले.