गुजरातमधली उनामध्ये गोहत्येच्या आरोपावरून चार दलित युवकांना मारहाण झाल्याचे प्रकरण देशभरात गाजत असतानाचा अशीच आणखी एक घटना उघडकीस आली आहे. मध्य प्रदेशातील मंदसूर रेल्वे स्थानकावर गोमांस बाळगल्याच्या संशयावरून दोन मुस्लिम महिलांना गोरक्षक समितीच्या महिला कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही महिलांकडे तब्बल ३० किलो गोमांस सापडले आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी हे मांस म्हशीचे असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. मध्य प्रदेशात परवानगीशिवाय म्हशीचे मांस आयात करण्यावर बंदी आहे. त्यामुळे या दोन्ही महिलांना तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, सध्या सोशल मिडीयावर या महिलांना मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणात दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मध्य प्रदेशचे गृहमंत्री भुपिंदर सिंग यांनी दिली आहे. बहुजन समाजवादी पक्षाच्या प्रमुख मायावती यांनीदेखील या घटनेचा निषेध केला आहे. भाजपकडून ‘महिलाओ के सन्मान मे, बीजेपी मैदान मे’ अशा घोषणा देण्यात येतात. तरीही मध्य प्रदेशात महिलांना गोमांस बाळगल्याच्या संशयावरून मारहाण करण्यात आली, असे मायावती यांनी म्हटले.
दलितांवरील अत्याचारांची फक्त चर्चाच होते, मायावतींचा आरोप
काही दिवसांपूर्वीच गुजरातमधील उनामध्ये गोरक्षक संघटनेच्या तरुणांनी चार दलित मुलांना अमानुषपणे मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर संपूर्ण देशात पडसाद उमटले होते. गाईची हत्या करून तिचे कातडे काढल्याच्या आरोपावरून या तरुणांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणाचे पडसाद दिवस संसदेतही उमटले. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत सरकारवर टीका केली होती.
उनामधल्या गायीला दलितांनी नाही तर सिंहाने मारले- सीआयडी