तिहेरी तलाक आणि घरगुती हिंसाचारानं पीडित सुमारे ४० मुस्लिम महिलांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना राख्या पाठवल्या असून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी आम्हाला न्याय मिळवून देत रक्षणकर्ता भाऊ असल्याची जबाबदारी पार पाडावी, असं या महिलांनी म्हटलं आहे.

तिहेरी तलाकपीडित २२ वर्षीय ईशा खान हिनं योगी आदित्यनाथांना पिवळ्या रंगाची राखी पाठवली आहे. दीर आणि नणंदेच्या त्रासाला कंटाळून पतीकडे तक्रार केली. पण मदत करण्याऐवजी पतीनं मला तलाक दिला. भाजपनं निवडणुकांपूर्वी माझ्यासारख्या पीडित महिलांना मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. ही राखी पाठवून मी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत आहे, असं ईशाचं म्हणणं आहे. २७ वर्षांच्या फरहानानंही योगींना राखी पाठवली आहे. मुलगी झाली म्हणून पतीनं तलाक दिला. आम्हाला मुलगा व्हावा, असं पतीला वाटत होतं. पण मुलगी झाली. त्यामुळं त्यानं तलाक दिला आणि आता तर सौदीला निघून गेला. तो गेल्यानंतर सासरच्या मंडळीनं मला मुलीसह घरातून बाहेर काढलं. मी पुन्हा सासरी गेले तर त्यांनी दीराशी निकाह हलाला करण्यास सांगितलं. पण मला ते मान्य नाही. या रक्षाबंधनाला मी योगी आदित्यनाथ यांना राखी पाठवून त्यांच्याकडे मदत मागितली आहे. ते माझी समस्या नक्कीच सोडवतील, असा विश्वास तिनं व्यक्त केला. या सर्व महिलांनी ‘मेरा हक’ या एनजीओच्या माध्यमातून योगी आदित्यनाथ यांना राख्या पाठवल्या आहेत. अनेक महिलांनी या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी केल्या आहेत. पण त्या मागे घेण्यासाठी सासरच्या मंडळींकडून त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. धमक्याही दिल्या जात आहेत. त्यांना कुणाचाही आधार नाही. त्यामुळं योगी आदित्यनाथ यांना राख्या पाठवून मदत मागितली आहे, असं एनजीओच्या संचालिका फरहत नक्वी यांनी सांगितलं.