मुस्लिमांनी त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध करु नयेत, असा फतवा दारुल उलूम देवबंदकडून जारी करण्यात आला आहे. मुस्लिमांनी त्यांचे फोटो फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अॅपवर शेअर करु नयेत, असेही फतवा काढताना दारुल उलूम देवबंदने म्हटले आहे. मुस्लिमांनी स्वत:चे किंवा त्यांच्या कुटुंबीयांचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करु नयेत, असेही दारुल उलूम देवबंद संघटनेने म्हटले आहे.

सोशल मीडियावर फोटो अपलोड करणे इस्लामच्या विरोधात असल्याचे दारुल उलूम देवबंदने म्हटले आहे. मात्र यामागील नेमके कारण त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. सोशल मीडियावर फोटो अपलोड न करण्याचे जोरदार समर्थन देवबंदकडून करण्यात आले आहे. ‘सोशल मीडियावर फोटो अपलोड करणे चुकीचे आहे. त्यामुळे आमचा फतवा योग्यच आहे,’ असे दारुल उलूम देवबंदच्या शहनवाझ काद्री यांनी म्हटले आहे.

सोशल मीडियावर फोटो अपलोड करण्याबद्दल एका व्यक्तीने लिखित स्वरुपात दारुल उलूम देवबंदला प्रश्न विचारला होता. ‘मी किंवा माझ्या पत्नीने फेसबुक आणि व्हॉट्स अॅपवर फोटो टाकणे इस्लामच्या विरोधात आहे की नाही ?,’ असा प्रश्न संबंधित व्यक्तीने विचारला होता. या प्रश्नाला दारुल उलूम देवबंदकडून उत्तर देण्यात आले. अशा प्रकारच्या कृतीला इस्लाम मान्यता देत नाही, असे त्या व्यक्तीला सांगण्यात आले.

याआधी दारुल उलूम देवबंदने मुस्लिम महिलांनी केस कापू नये, तसेच त्यांच्या भुवयाही कोरु (आय-ब्रो) नयेत, असा फतवा काढला होता. मौलाना सादिक काजमी यांनी हा फतवा जारी करत या गोष्टी इस्लाममध्ये निषिद्ध असल्याचे म्हटले होते. दारुल उलूमने याआधीच हा फतवा जारी करायला हवा होता, असेही काजमी यांनी म्हटले होते. सहारणपूर येथील एका मुस्लिम माणसाने त्याच्या पत्नीचे केस कापण्याबाबत सादिक काजमी यांच्याकडे सल्ला मागितला होता. ‘मुस्लिम धर्मात महिलांनी केस कापणे आणि भुवया कोरणे योग्य आहे का?’ असे त्याने विचारले होते. त्यानंतर काही दिवसातच हा फतवा जारी करण्यात आला.