देशातील अल्पसंख्यांक समाजाचा पोलीस दलावरील विश्वास कमी झाला असून पोलीस दलाची प्रतिमा जातीयवादी, भ्रष्ट, पक्षपाती आणि व्यावसायिक दृष्टीकोनाची कमतरता असल्यासारखी असल्याचा निष्कर्ष पोलीस दलाने काढला आहे.
संजीव दयाल (महाराष्ट्र), देवराज नागर (उत्तरप्रदेश) आणि के.रामानुजम (तामीळनाडू) या तीन राज्यांच्या पोलीस महासंचालकांच्या अहवालानुसार, देशातील अल्पसंख्यांक समाजाच्या प्रश्नांवर पोलीस दलाने संवेदनशील होण्याची गरज आहे. तसेच पोलीस दलातील काहींची जातीय दंगली उसळल्या गेलेल्या राज्यांत नियुक्ती केली गेल्यानेही मुस्लिमांच्या मनात पोलीस दलाबद्दलच्या पक्षपातीपणाच्या संशयाला खतपाणी घातले गेले आहे. तसेच पोलीस दलात मुस्लिमांची संख्याही कमीच राहिली आहे. यापार्श्वभूमीवर अल्पसंख्यकांच्या मनात पोलीस दलाच्या प्रतिमेला सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
तसेच पोलीसांमधील खाक्या वृत्तीमुळे येणारे अडथळे दूर करण्यासाठी सर्व स्तरांवरील पोलीसांना प्रशिक्षण देण्याची नितांत गरज असल्याने त्यासंबंधिच्या प्रशिक्षणाची शिफारस देखील अहवालात करण्यात आली आहे. प्रशिक्षणाचे विविध कार्यक्रम, अफवा आणि सोशल नेटवर्किंगवरील चिथावणीखोर वक्तव्ये हाताळण्यासाठी त्यासंबंधिची विशेष स्वतंत्र शाखा असे काही महत्वाचे मुद्देही यामध्ये सुचविण्यात आले आहेत. हा अहवाल सध्या केंद्र सरकारकडे असून त्यावरील प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत पोलीस दल आहे.