२० जानेवारीला डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रं  हातात घेतील. सगळ्या धर्मांविरूध्द, महिलांविरूध्द, स्थलांतरितांविरूध्द आणि  सगळ्या जगाविरूध्द गरळ ओकत प्रचार करत पुढे आलेला हा माणूस जगातल्या सर्वात शक्तिशाली सत्तेचा प्रमुख होणार आहे.

“माझी मुलं खूप घाबरली आहेत. ट्रम्प अध्यक्ष झाल्यावर आपल्याला देश सोडून जावं लागेल का असं ते सारखं विचारत आहेत.”

हे कोण्या साध्यासुध्या अमेरिकन व्यक्तीचे उद्गार नाहीत. आपल्या मुलांना वाटणारी ही भीती जाहीरपणे सांगणारी ही व्यक्ती आहे भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या सहाय्यक परराष्ट्र मंत्री निशा देसाई-बिस्वाल. अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या कार्यकाळादरम्यान त्यांची नेमणूक केली होती. २० जानेवारीला बिस्वालसुध्दा त्यांच्या पदावरून पायउतार होतील.

डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाल्यापासून बिस्वाल यांची मुलं घाबरून त्यांना अनेक प्रश्न विचारत आहेत.

“माझी मुलं १० वर्षांचीही नाहीयेत. पण त्यांच्यापर्यंतही ट्रम्प यांनी अमेरिकन समाजामध्ये भिनवलेला द्वेष पोचतोय” बिस्वाल म्हणाल्या “अजाणत्या वयातही या मुलांना एवढी भीती वाटतेय तर गौरवर्णीय नसलेल्या पण अमेरिकन असलेल्या लाखो अमेरिकन नागरिकांना काय वाटत असेल याचा विचार करवत नाही”

ट्रम्प निवडून आल्यावर अमेरिकेच्या अनेक भागात उन्माद पसरला होता. कृष्णवर्णीय, मेक्सिकन तसंच भारतीय आणि पाकिस्तानी वंशांच्या नागरिकांना विशेषत: महिलांना अनेकवेळा वर्णवादी अमेरिकनांनी प्रत्यक्ष लक्ष्य केलं. हा उन्माद एवढा पसरला आहे की शाळेतली मुलंही रंगाने गोरे नसलेल्या मुलांना ग्रुप करत लक्ष्य करत आहेत. साध्या दादागिरीपेक्षाही हा प्रकार बराच पुढे गेलाय. ट्रम्प निवडून येण्याआधीपासून हे प्रकार सुरू झाले. ही मुलं कृष्णवर्णीय मुलांना चिडवतानाचे व्हिडिओज् सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

 

सौजन्य- यूट्यूब

आपल्याला अमेरिकेत राहू शकतो की नाही असा प्रश्न सारखा विचारणाऱ्या आपल्या मुलांना निशा देसाई-बिस्वाल त्यांना हा अधिकार असल्याचं ठामपणे सांगतात. एक अमेरिकन नागरिक म्हणून अमेरिकेत राहणं हे आपलं कर्तव्यच आहे असं त्या आपल्या मुलांना सांगतात.

ट्रम्प यांच्या निवडीनंतर त्यांनी सूत्र हातात घेण्याआधीच सध्या पसरलेल्या उन्मादासारखं वातावरण अगदी ११ सप्टेंबर २००१ च्या दहशतवादी हल्ल्यानंतरही नव्हतं. ११ सप्टेंबरनंतर अनेक ठिकाणी अल्पसंख्याकांवर हल्ल्याच्या घटना घडल्या. पण अशा घटना पसरू नयेत यासाठी त्यावेळच्या जाॅर्ज बुश सरकारने पुढाकार घेत उपाययोजना केल्या होत्या. जाॅर्ज बुश यांनी स्वत: एका मशिदीला भेट दिली होती. तसंच अमेरिकेतल्या शीख नागरिकांनी घातलेल्या पगडीमुळे त्यांना अरब समजत त्यांच्यावर हल्ले झाल्यावर याला आळा घालण्यासाठी बुश सरकारने जनजागृती केली होती. शीख समाजावरच्या हल्ल्यांविरूध्द अमेरिकन संसदेत त्यावेळी ठरावही पास करण्यात आले होते. पण आता अमेरिकन समाजात याहूनही कितीतरी जास्त पटींनी निर्माण झालेला हा उन्माद शमवायला सरकारी यंत्रणा पुढे न येता त्याला उत्तेजनच देते की काय अशी शंका डोनाल्ड ट्रम्प यांच्यानिमित्ताने निर्माण होतेय.

अमेरिकेचा इतिहासच मुळात स्थलांतरितांनी बनवलेला आहे. ब्रिटिशांनी अमेरिकेत वसाहती तयार करण्याआधी अमेरिकेत असणारे ‘रेड इंडियन्स’ हे  गव्हाळ वर्णाचे होते. त्यांच्या प्रदेशावर आक्रमण करत, प्रसंगी त्यांची कत्तल करत गोऱ्या लोकांनी इथे पाय रोवले. यानंतरही जगाच्या सगळ्या प्रदेशांमधून निरनिराळ्या वंशांचे आणि धर्माचे लोक इथे आले आणि मेहनतीने त्यांनी आधुनिक अमेरिकेचा पाया रचला. अमेरिकन राष्ट्राच्या उभारणीच्या वेळेला ज्या तत्वांच्या रक्षणांसाठी आम्ही सर्व काही करू अशी ग्वाही देण्यात आली होती त्याच लोकशाही तत्वांची यापुढे समतेचा देश म्हणवणाऱ्या अमेरिकेत होळी होते की काय हे थोड्याच काळात कळेल.